महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हा महाविकास आघाडीचा प्रयोग देशात केला जाईल आणि भाजपचा सत्तेवरून पायउतार होईल, त्याची सुरुवात गोवा विधानसभा निवडणुकीपासून केली जाईल, असे स्वप्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाहिले खरे पण वास्तवात उतरले नाही. कारण गोव्यात शिवसेनेसोबत निवडणूक लढण्यास काँग्रेसने नकार दिला आहे. त्यामुळे गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर २२ जागा लढवणार आहे. शिवसेना २२ जागा लढविणार असून कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करण्याची सध्याची गरज नाही. आमचे पक्ष संघटन मजबूत आहे आणि त्या जोरावर आम्ही त्या जागा जिंकू, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.
स्वबळाचा निर्णय
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते आणि मंत्र्यांची ऑनलाईन बैठक झाली. गोव्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्यात फारशी अनुकूलता न दाखवल्याने शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांच्याशी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोव्यात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली होती. जागा वाटपात स्थानिक नेत्यांचा सुरुवातीपासून सकारात्मक सूर नव्हता. यामुळे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
( हेही वाचा : 5 राज्यांची निवडणूक : यंदा भाजपचे काय होणार? काय सांगतो सर्वे? )
मतदार संघ नेमून देणार
गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांना मतदार संघ नेमून दिले जाणार आहेत या संदर्भात आज कोअर कमिटीची घोषणा होणार आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, माजी मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार सुनील प्रभू, युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई हे बैठकीत सहभागी झाले होते. तसेच गोव्यासमवेत उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी व्यूहरचना ठरवण्यासाठी सुद्धा आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक होणार आहे.
Join Our WhatsApp Community