हिंदुत्वासंबंधी भाजपासोबतचे नाते कायम राहणार! संजय राऊतांची भूमिका

नारायण राणे यांचे जे प्रयत्न सुरु आहेत, ते भाजपा आणि  शिवसेना यांचे संबंध सुधारण्यासाठी चांगले प्रयत्न आहेत, असेही उपरोधिकत टोला संजय राऊत यांनी हाणला. 

जशी बांगलादेशातून घुसखोरी होते आणि अवैध धंदे सुरु होतात, तशी भाजपमध्ये घुसखोर झाली आहे. बाहेरून आलेले हे दगड मारत आहेत आणि थपडा मारण्याच्या भाषा करत आहेत. असे प्रकार भाजपचे नेते करत नाही. भाजपशी शिवसेनेचे नाते हिंदुत्वाच्या विचारांशी जोडलेले आहे आणि ते कायम राहणार आहे, अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली.

नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे यांच्यात चांगले नाते! 

भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यांच्याशी शिवसेनेचे २५ वर्षे नाते होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यामध्ये उत्तम नाते होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही चांगले संबंध आहेत. ज्याप्रकारे सध्या भाजपमध्ये बाहेरून आलेले भाषा वापरात आहेत, तशी भाषा देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार वापरत नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.

(हेही वाचा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : भाजपाला गरजेपुरते आठवतात का वीर सावरकर?)

राणे वैयक्तीक दुश्मनी काढतात!  

राजकारणात वैचारिक मतभेद असतात, वैयक्तीक दुश्मनी नसते. राणे मात्र वैयक्तीक दुश्मनी काढत आहेत. देशभरात तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढू शकतात, जनतेचे समर्थन मिळवण्याचा सर्वांना अधिकार आहेत. तशी देशभरात जन आशीर्वाद यात्रा निघत आहे, पण फक्त महाराष्ट्रातच का वाद निर्माण झाला आहे? तुमच्यात जर इतकी गुर्मी आहे, तर मग २ वर्षांपासून गाझीपूर येथे शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत, त्यांच्याशी चर्चा करा, असेही राऊत म्हणाले.

भाजपने बाहेरून आलेल्यांना इतिहास शिकवावा! 

कायदा सर्वांना समान असतो, राज्यात झालेल्या राड्यात भाजप सह शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. राणे म्हणतात महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे कि राणेंना आणि भाजपाला बंगालच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी माहिती नाही आणि बंगालविषयी असे वक्तव्य करणे हा तेथील स्वातंत्र्य सेनानींचा अवमान आहे. बंगालने स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे बंगाल काय आहे, हे महाराष्ट्राला समजावण्याची गरज नाही. त्यामुळे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी काय असते, हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही. उलट भाजपनेच बाहेरून आलेल्यांना इतिहास शिकवावा, इतिहासाचे पुस्तक द्यावे. या प्रकरणी विदर्भातून ७५ हजार लेटर भाजप पाठवणार आहे. त्यांची ही वैफल्यता आहे. लेटर पॉलिटिक्स करा किंवा गटर पॉलिटिक्स करा, आमच्याशी सामना करणे त्यांना अशक्य आहे, असेही राऊत म्हणाले.

शिवसेना-भाजप संबंध सुधारण्यासाठी राणेंचे उत्तम प्रयत्न!

राजकरणात यात्रा काढायला बंधन नाही, पण या यात्रांच्या मागील हेतू महाराष्ट्राला समजला नाही. यावेळी संसदीय अधिवेशन सुव्यवस्थित पार पडू शकले नाही. म्हणून पंतप्रधान मोदी यांनी सरकार देशासाठी काय काम करत आहे, हे लोकांना सांगण्यासाठी नव्या मंत्र्यांना या यात्रा काढण्यासाठी आवाहन केले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेवर चिखलफेक करा, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले नाही. म्हणजे तुम्ही पंतप्रधान मोदी यांचेही ऐकत नाही, असे स्पष्ट होते. आम्ही टीका करणारच, ज्यांना राजकारणात काम करायचे आहे, त्यांना ती सहन करावी लागणार आहे. आमच्या बरोबर भाषेशी बरोबरी करू नका, आम्ही चांगलेच उत्तर देऊ, नारायण राणे यांचे जे प्रयत्न सुरु आहेत, ते भाजपा आणि  शिवसेना यांचे संबंध सुधारण्यासाठी चांगले प्रयत्न आहेत, असेही उपरोधिकत टोला राऊत यांनी हाणला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here