कंगनाची उद्धव ठाकरेंवर टीका, तरीही प्रवक्त्यांचे मौन का?

175

कार्यालयावर पालिकेने कारवाई केल्यांनतर अभिनेत्री कंगना राणावत चांगलीच भडकली असून, ती ट्विटच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहे. मात्र कंगनाकडून वारंवार टीका होत असताना शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते गप्प तरी कसे काय बसले असा प्रश्न सर्व शिवसैनिकांना पडला आहे. मात्र त्यांच्या गप्प बसण्यामागचे खरे कारण आहे मातोश्रीवरून आलेला आदेश. कंगनाला जे बोलायचे ते बोलू द्या पण तुम्ही या विषयावर बोलू नका असा आदेशच थेट मातोश्रीवरून सर्व शिवसेनेच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना देण्यात आला आहे.

संजय राऊतांकडे जबाबदारी

दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने नवीन प्रवक्त्यांची यादी सामनामधून जाहीर केली असून, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह इतर नेत्यांची यादीही शिवसेनेने जाहीर केली आहे. इतर सदस्य प्रवक्त्यांमध्ये खासदार अरविंद सावंत, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार निलम गोऱ्हे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापौर किशोरी पेडणेकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सुनील प्रभू यांचीही प्रवक्ते म्हणून घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आली आहे. यावेळी राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचीही प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. मात्र या सर्व प्रवक्त्यांना गप्प राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पक्षाची जी काही भूमिका असेल ती संजय राऊत मांडतील असे आदेश मातोश्रीकडून देण्यात आले आहेत.

शिवसेना ‘सोनिया सेना’

कंगनाचा ट्विटर वॉर वारंवार सुरु असून, आज सकाळी देखील कंगनाने शिवसेनेचा सोनिया सेना असा उल्लेख केला आहे. श्री बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेना निर्माण केली, आज तीच विचारधारा सत्तेसाठी विकली आणि शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली. ज्या गुंडांनी माझे घर माझ्या मागे फोडले, त्यांना नागरी संस्था म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका” असे ट्विट कंगनाने केले आहे.

कंगना उद्धव ठाकरेंना काय म्हणाली?

“उद्धव ठाकरे तुला काय वाटते? तुम्ही फिल्म माफियासोबत माझे घर तोडून फार मोठा सूड उगवलात. आज माझे घर मोडले आहे, उद्या तुझा अहंकार मोडेल.” अशी एकेरी भाषा कंगनाने वापरली होती. “ही वेळेची किमया आहे, लक्षात ठेवा… प्रत्येक वेळी वेळेचे चक्र सारखेच राहत नाही. आता मला वाटते की, तुम्ही माझ्यावर फार मोठे उपकार केले आहेत. कारण मला माहित होते की काश्मिरी पंडितांवर काय बेतले असेल, आज मी त्याचा अनुभव घेतला आहे.” असेही कंगना म्हणाली होती. “मी या देशाला आज वचन देते, मी फक्त अयोध्येवरच नाही, तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवेन. त्यातून देशावासियांचे प्रबोधन करेन. कारण मला माहिती होतं, की हे होणार. माझ्यासोबत जे झाले त्याची काही कारणे आहेत, काही पार्श्वभूमी आहे. उद्धव ठाकरे हे क्रौर्य, ही दहशत आहे. बरे झाले हे माझ्यासोबत घडले. याच्यामागे काही कारणे आहेत.” असे कंगना शेवटी म्हणाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.