सुषमा अंधारेंवर शिवसेना लवकरच सोपवणार नवीन जबाबदारी

170

आंबेडकर चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सध्या त्या पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकांमध्ये हजेरी लावताना दिसत आहे.शिवसेनेने त्यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी सोपवली असली तरी त्यांच्यातील वक्तृत्व कुशलता आणि विरोधकांकवर तुटून पडण्याची धाडसी वृत्ती पाहता आता पक्ष त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी सोपवण्याचा विचारात असल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या माध्यमातून लवकरच त्यांची प्रवक्तेपदी नियुक्ती केली जाणार असून त्यांची भूमिका ही मुख्य प्रवक्तेपदाचीच असेल असेच बोलले जात आहे.

( हेही वाचा : मुंबईच्या जैवविविधतेला मिळाली आंतरराष्ट्रीय ओळख; ठाणे खाडी आता रामसर स्थळ)

शिवसेना नेते आणि राज्य सभा सदस्य संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचनालयाने(ईडी) अटक केल्यानंतर शिवसेनेची ह तोफ थंडावली आहे. दररोज सकाळी नाश्त्याला संजय राऊत यांची बातमी चर्वण झाल्याशिवाय माध्यमांचा दिवस सार्थकी लागत नव्हता. तसेच जनतेलाही सजय राऊत बुलेटीनची सवय झाली होती. शिवसेनेची ठोस भूमिका मांडताना विरोधकांचा सडकून समाचार राऊत यांच्याकडून घेतला जात होता. राऊत यांनी मांडलेले विचारच पुढे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मांडताना दिसत होते. त्यामुळे पक्षाची भूमिका सध्या योग्यप्रकारे मांडण्यात येत नसल्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती आता सुषमा अंधारे यांच्याकडे पक्षाचे प्रवक्तेपद देऊन विरोधकांवर हल्ला चढवण्याची रणनिती सध्या शिवसेनेकडून आखली जात असल्याची माहिती मिळत आहे.

प्रवक्तेपद देण्याचा विचार सुरु

शिवसेनेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे, प्रियंका चर्तुवेदी आदी प्रवक्ते असले तरी संजय राऊत यांच्याप्रमाणे विरोधकांना अंगावर घेण्याची धमक या पदाधिकाऱ्यांमध्ये नाही. अरविंद सावंत हे मुद्देसुद पक्षाचे धोरण मांडून विरोधकांचा समाचार घेऊ शकतात, पण जहालपणे बोलू शकत नाही. तर किशोरी पेडणेकर या माध्यमांमध्ये प्रिय असल्या तरी त्यांच्या बोलण्याकडे विरोधक तेवढे गंभीरतेन लक्ष देत नाही. तर मनिषा कायंदेही याही नियमांच्या चौकटीत राहून समाचार घेऊ शकतात. विरोधकांना प्रश्न विचारु शकतात. परंतु त्याच्या बोलण्याचा प्रभाव विरोधकांवर होत नाही. त्यामुळे संजय राऊत यांच्याप्रमाणे तोंड सोडून बोलण्याची हातोटी सध्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये आहे. त्यांच्या बिनधास्तपणे निडरता असेच शब्दांचे सामर्थ्य तसेच शब्द फेक चांगल्याप्रकारे करत विरोधकांना घायाळ करण्याची ताकद त्यांच्याकडे असल्याने राऊत यांच्या अनुपस्थितीमध्ये अंधारे यांना प्रवक्तेपद देण्याचा विचार सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय राऊत यांच्या अनुपस्थितीत निलम गोऱ्हे यांच्यावर पक्षाच्या प्रवक्तेपदाची मदार राहिली असती. परंतु निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती असल्याने त्यांना माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडण्यात राजशिष्टाचार आड येत आहे. त्यामुळे निलग गोऱ्हे यांच्यानंतर आता सुषमा अंधारे यांचे नाव घेतले जात असून भाजपकडून तसेच शिंदे गटाकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक टिकेला अंधारे याच तिखट शब्दात प्रत्युत्तर देऊ शकतात, असा विश्वास उध्दव ठाकरे यांना आहे. परंतु पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना उपनेतेपद देऊन पक्षाची धोरणे समजून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक बैठकीला त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या जात आहे. त्यामुळे पक्षाची ध्येयधोरणे आत्मसात केल्यानंतर अंधारे यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. मात्र, तोपर्यंत त्यांना माध्यमांशी बोलण्यास परवानगीही दिली असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.