अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : मविआची साथच तारु शकेल शिवसेनेला

105

अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्राची आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार असून या जागेसाठी शिवसेनेने लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर भाजपच्यावतीने मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी लढलेल्या माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे सहानभूती विरोधात भाजप आणि शिंदे गट अशीही निवडणूक पहायला मिळणार असून या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार न देता आघाडीमध्ये ही निवडणूक लढल्यास शिवसेनेचा विजय सुकर असल्याचे बोलले जात आहे.

( हेही वाचा : मुंबईतील सौंदर्यीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी आयुक्तांनी लावली अधिकाऱ्यांमध्येच स्पर्धा)

अंधेरी पूर्व येथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचा १२ मे रोजी दुबईमध्ये ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार असून आठ दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या जागेवर लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रमेश लटके हे तीन वेळा नगरसेवक आणि दोन वेळा आमदार राहिल् आहेत. सन १९९७ ते २००२, सन २००२ ते २००७ आणि २००७ ते २०१२ पर्यंत ते नगरसेवक होते, तर सन २००९ मध्ये त्यांनी प्रथम विधानसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्या अवघ्या पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर सन २०१४मध्ये त्यांनी निवडणूक लढवताना भाजपचे सुनील यादव यांचा पाच हजार मतांनी पराभव केला होता. तर सन २०१९मध्ये युतीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवताना ६२ हजार ७७३ मते घेतली होती, तर भाजपचे बंडखोर उमेदवार मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यामध्ये लटके यांनी तब्बल १७ हजार मतांनी पटेल यांचा पराभव केला होता. मुरजी पटेल यांना त्या निवडणुकीत ४५ हजार ८०८ आणि काँग्रेसचे उमेदवार जगदीश अमिन कुट्टी यांना २७ हजार ९५१ मते मिळाली होती.

मात्र, अपक्ष म्हणून मुरजी पटेल यांनी कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केल्याने यावेळेस भाजपच्यावतीने त्यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे मुरजी पटेल यांना वैयक्तिक मिळालेली ४५ हजार मते आणि याला भाजपची अधिक मते मिळाली आणि शिंदे गटाचीही मतांची भर पडल्यास पटेल यांचे पारडे जड ठरले जावू शकते,असा अंदाज आहे. शिवाय काँग्रेसन उमेदवारी न दिल्यास मुरजी पटेल यांच्याच बाजुने कल झुकू शकतो,असेही बोलले जात आहे.विशेष म्हणजे पोटनिवडणूक ही सहानभूतीवर लढली जाते. पतीच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी ऋतुजा निवडणूक रिंगणात उतरत असल्याने शिवसेना त्यांच्या पदरात सहानभूतीच अधिकाधिक मते पाडण्यासाठी मतांचे राजकारण करणार,अशीही शक्यता आहे. मात्र, यासर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस आपला उमेदवार देतो की, महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास मुरजी पटेल यांना ही निवडणूक जड जाईल.

विशेष म्हणजे सन २०१४च्या निवडणुकीत आमने सामने आलेल्या रमेश लटके आणि सुनील यादव या दोघांमध्ये काही महिन्यांच्य अंतराने निधन झाले आहे. त्यामुळे शिवसेनेने लटके यांच्या पत्नीला उमेदवारी निश्चित केल्याने भाजप मुरजी पटेल यांच्याऐवजी यादव यांच्या पत्नी संध्या यादव यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करेल का? कि आगामी महापालिका निवडणुकीत संध्या यादव यांना उमेदवारी देत याठिकाणी मुरजी पटेल यांचे नाव अंतिम करते याकडेही सर्वांचे लक्ष आहे. शिवसेना भाजप युती असल्याने सुनील यादव यांच्या पत्नी संध्या यादव यांना शिवसेनेत पाठवून त्यांना सेनेतून उमेदवारी देत निवडणून आणले होते. युती असल्याने उमेदवार तिथे पाठवून हा प्रकार घडला असला तरी रमेश लटके व सुनील यादव हे मित्र असल्याने त्या दोघांनी एकमेकांना कायमच सांभाळून घेतले होते. त्यामुळे संध्या यादव यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांना भाजपचा उमेदवार निवडून आणण्यात मोठे प्रयत्न करावे लागणार आहे. मात्र, याठिकाणी निवडून येण्याची शक्यता अधिक असल्याने मुरजी पटेल यांना शिंदे गटात पाठवून शिवसेना विरुध्द शिवसेना अशीही लढतही निर्माण केली जावू शकते,असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.