दादरा-नगर हवेली विजय : सेनेचे हे सीमोल्लंघन पहिले नव्हे!

सेनेचा १९९१ मध्ये उत्तर प्रदेशात पहिला आमदार निवडून आला होता.

शिवसेनेने केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेली येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून राज्याबाहेरचा पहिला खासदार उभा केला आहे. त्यामुळे सेनेच्या पक्ष विस्ताराच्या महत्वाकांक्षा वाढल्या असणार हे निश्चित आहे. मात्र सेनेसाठी हा विजयी विस्तार पहिलाच नाही. याआधीही सेनेने राज्याचे सीमोल्लंघन केले आहे, तेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली!

उत्तर प्रदेशात रोवलेला झेंडा 

सेनेची स्थापना मुळात मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी झाली. त्यामुळे ६० ते ८० च्या दशकापर्यंत शिवसेनेकडे प्रादेशिक पक्ष म्हणून पहिले जात होते. मात्र सेनेचा विस्तार देशभर व्हावा, अशी शिवसेनाप्रमुखांची इच्छा होती. त्या इच्छेपोटी सेनेने उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, गुजरात या राज्यांत निवडणुकाही लढवल्या, पण बाळासाहेब प्रचाराला गेले नाही. कदाचित या कारणामुळे सेनेला त्यात यश मिळाले नसावे. पण ९०च्या दशकात सेनेने हिंदुत्व अंगिकारले आणि सेनेचा विचार विस्तार झाला. त्याचा परिणाम म्हणून सेनेचा १९९१ मध्ये उत्तर प्रदेशात पहिला आमदार निवडून आला होता. बाहुबली पवन पांड्ये असे त्या आमदाराचे नाव होते.

(हेही वाचा : अनिल देशमुखच ‘नंबर १’! काय म्हटले ईडीने न्यायालयात?)

आणि सेनेची उत्तर प्रदेशात घोडदौड सुरु झाली! 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून पवन पांड्ये त्यावेळी उत्तर प्रदेशात शिवसेनेचा सर्वाधिक वर्चस्व असलेला चेहरा म्हणून पुढे आला. त्यावेळी पवन पांड्ये यांच्या नेतृत्वात शिवसेनेने गोरखपूर, बलिया, मेरठ, वाराणसी, लखनऊ याठिकाणच्या स्थानिक निवडणुकीतही वर्चस्व दाखवून दिले होते. परंतु त्यानंतरच्या निवडणुकीत पवन पांड्ये निवडून आले नाहीत.

सेनेचे अस्तित्व संपले! 

त्यावेळीच्या मुख्यमंत्री मायावती यांनी त्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातील गुंडावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आणि पवन पांड्ये मुंबईला पळून आले. उत्तर प्रदेशात शिवसेना विस्तारासाठी कुठलेही नेतृत्व राहिले नाही. दुर्दैवाने सेनेचे अस्तित्व संपले. आता दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर शिवसेनेची राष्ट्रीय पक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा पुन्हा बळावणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here