जळगावात शिवसेनेकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रम… महापालिकेवर ‘भगवा’ फडकला!

सांगली महापालिकेत राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी भाजपचा टप्प्यात कार्यक्रम केल्यानंतर आता तोच पॅटर्न शिवसेनेने जळगावात वापरला आहे.

96

जळगाव महापालिकेत सांगली पॅटर्न यशस्वी झाला असून, भाजपचा टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करण्यात आला आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन विजयी झाल्या आहेत. तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे. त्यामुळे सांगली महापालिकेत राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी भाजपचा टप्प्यात कार्यक्रम केल्यानंतर आता तोच पॅटर्न शिवसेनेने जळगावात वापरला आहे.

गाठला बहुमताचा आकडा

ज्या जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता होती, त्याला सुरुंग लावण्यात शिवसेनेला यश आले आहे. शिवसेनेने ३८ हा बहुमताचा आकडा पार करत, ४५ मते मिळवली आणि जळगाव महापालिकेवर भगवा फडकवला. तर भाजपच्या वाट्याला केवळ ३५ मते आली आहेत. विशेष म्हणजे, जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला हादरा देत ५७ पैकी तब्बल ३० नगरसेवक सेनेत दाखल झाले होते. या निवडणुकीच्या आधीपासूनच भाजपचे २७ आमदार शिवसेनेच्या संपर्कात असून, ते शिवसेना नेत्यांसोबत सहलीला गेले होते. हे २७ नगरसेवक ठाण्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना भेटले होते. याशिवाय एमआयएमचे ३ आणि शिवसेनेचे १५ असे ४५ नगरसेवकांचे पाठबळ नियोजित महापौर जयश्री महाजन व नियोजित उपमहापौर कुलभूषण पाटील यांना असल्याचे निश्चित झाले होते.

(हेही वाचाः गुलाबराव की खडसे, भाजपचे नगरसेवक नेमके कोणी फोडले?)

भाजपला दिला होता धक्का

कोविडचा संसर्ग वाढत असल्याने ही निवडणूक ऑनलाइन करण्याचे ठरवले होते. या ऑनलाइन मतदानाला हरकत घेणारा अर्ज भाजप नगरसेविका रंजना विजय सोनार व विश्वनाथ खडके यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल केला होता. कोवीड संसर्गाचा प्रभाव कमी झाला असून महापौर निवड आॕनलाईनऐवजी सभागृहात व्हावी, अशी मागणी या अर्जात होती. सरकारने कोविड प्रादुर्वाभ रोखण्यासंदर्भात केलेल्या नियोजनात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे सांगून, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. त्यामुळे परीक्षेआधीच शिवसेना या निवडणुकीत पास झाली होती.

नवग्रहांची शक्ती, भाजपला साडेसाती

शिवसेनेचा हा संभावित विजय कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, विनायक राऊत, गुलाबराव पाटील, गजानन मालपुरे, नितीन लढ्ढा, संजय महाजन व कुलभूषण पाटीलसह नवग्रह मंडळाची वक्रदृष्टी पडल्याने भाजपला साडेसाती लागली आहे, असेच म्हणावे लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.