संजय राऊत यांच्यावर राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी?

182

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचा राज्यसभा सदस्यत्व कालावधी संपुष्टात येत आहे. येत्या मे महिन्यात त्यांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने त्यांना राज्यसभेत निरोप देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात राऊत यांना दिल्लीत न पाठवता महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय करून घेण्याचा विचार शिवसेनेने केला आहे. पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना आपल्या सोबतच ठेवत, त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याचा विचार केलेला आहे आणि यासाठी राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले गृहमंत्री पद देण्याचा विचार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गृहमंत्री पद हे राऊत यांच्यासाठी सोडण्याचीही तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भविष्यात संजय राऊत यांना राज्याचे गृहमंत्री म्हणून पाहता येणार आहे.

( हेही वाचा : नाल्यातील गाळ आणि चर बुजवण्याच्या कामांना प्रशासकांची मंजुरी 

देशात मोदी सरकारमध्ये अमित शहा हे ज्या प्रकारे गृहमंत्रीपद हाताळत आहेत. अशाप्रकारे हे गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या सक्षम आणि कणखर नेत्याची गरज असल्याने राऊत हेच या पदासाठी योग्य असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. यामुळेच राऊत यांच्याकडे गृहमंत्री पद देण्याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकवाक्यता होताना दिसत आहे.

राज्यातील राजकारणात सामावून घेण्याचा विचार

महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर गेलेल्या काही सदस्यांचा कालावधी मे महिन्यात संपुष्टात येत आहे. यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पाटील आदींसह इतर खासदारांचा समावेश आहे. राऊत हे पुन्हा राज्यसभेवर जाण्याबाबत कोणत्याही अडचणी नाहीत. तरीही शिवसेना पक्ष त्यांना दिल्लीत न पाठवता राज्यातील सक्रिय राजकारणात सामावून घेत त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्याच्या विचारात असल्याची एक नवीन बातमी हाती आली आहे. सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत असल्याने त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून मंत्रिमंडळात सामावून घेण्याचा विचार सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यासाठी अनुकूल आहेत. संजय राऊत यांनी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्यामुळेच या सगळ्या घटनांमध्ये राऊत यांची ही भूमिका लक्षात घेता आणि सर्व मंत्र्यांवर होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राऊत यांना राज्यातील सक्रिय राजकारणात घ्यावे अशी शिवसेनेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे राऊत यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचा विचार शिवसेनेचा असला तरी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून त्यांचा सल्लाही घेतला आहे आणि त्यानंतरच राऊत यांना तूर्तास तरी राज्यसभेवर न पाठवता राज्यातील राजकारणात सामावून घेण्याचा विचार केला आहे. त्यातूनच राऊत यांना मंत्रिमंडळात घेण्याचाही विचार पुढे आला आहे.

भाजपच्या विरोधात यंत्रणा

यासाठी राऊत हे दोन दिवसात राज्यसभा सदस्यत्वचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेतले जाणार आहे. राऊत यांना मंत्रिमंडळात घेतल्यास त्यांना कोणते खाते द्यावे याबाबतही विचार झालेले आहे. राऊत यांनी गृहमंत्री पद हे शिवसेनेकडे असावे आणि महाराष्ट्राच्या गृहखात्याने कडक होण्याची भूमिका मांडली होती. त्यानंतरच शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले हे पद शिवसेनेकडे घेण्याची जबाबदारी राऊत यांच्यावर सोपवली. राष्ट्रवादी काँग्रेसनेही संजय राऊत यांच्याकरता हे पद सोडण्याचा विचार केला आहे. राऊत गृहमंत्रीपदी आल्यास ते पोलीस यंत्रणा सक्षमपणे चालवू शकतात आणि कायदा-सुव्यवस्थाही उत्तम राखू शकतात असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना वाटते. राऊत यांनी पत्रकारिता करताना प्रारंभी क्राईम बिट कव्हर केले आहे. पोलीस खात्याचे खाचखळगे त्यांना माहीत आहेत. त्यामुळे हा अनुभव हे पद सांभाळताना त्यांना खूप कामाला येणार आहे आणि म्हणूनच गृहमंत्रीपद हे त्यांना देण्याचा विचार सुरू आहे. सध्या केंद्राकडून ज्याप्रकारे ईडीसह केंद्रीय एजन्सीचा वापर करून मंत्र्यांना नाहक त्रास दिला जातो. त्यांना शह देण्यासाठी राज्यातील पोलीस यंत्रणेची मदत घेऊन भाजपच्या विरोधात एक यंत्रणा उभी केली जाईल आणि ज्याद्वारे भाजपच्या नेत्यांवर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल अशा प्रकारची रणनिती राऊत आखू शकतात आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

(संबधित वृत्त हे ‘एप्रिल फुल’ करण्याच्या उद्देशाने बनवले असून त्यात सत्य नाही. भविष्यात हे वृत्त खरे ठरल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.