शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरब़ॉम्बमुळे शिवसेना आमदारांची अस्वस्थता समोर आली होती. मात्र आता पुन्हा एकदा एका शिवसेना आमदाराने थेट आपल्या मंत्र्याविरोधात तक्रार केली असून, हे मंत्री महोदय दुसरे तिसरे कुणी नसून, शिवसेनेचे मातब्बर नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील आहेत. जळगावचे पालकमंत्री असलेले गुलाबराव पाटील हे मला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी केला आहे. चिमणराव पाटील हे पारोळ्याचे आमदार आहेत.
आमदार चिमणराव पाटील यांची व्यथा!
मी ज्येष्ठ आमदार असून, स्थानिक पातळीवर माझे मत विचारात घेतले जात नाही. गुलाबराव पाटील यांच्याकडून मला डावलले जाते, ही वस्तुस्थिती आहे, असे चिमणराव पाटील यांनी म्हटले. चिमणराव पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली आहे. गुलाबराव पाटील यांना माझे या भागातील वर्चस्व सहन होत नाही. त्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव घडवण्यात आला. त्यानंतर अजूनही मला अनेकदा डावलण्याचा प्रयत्न होतो. मी शिवसेनेत राहू नये, असे अनेकांना वाटत असल्याचेही चिमणराव पाटील यांनी म्हटले.
(हेही वाचा : खासदार गोपाळ शेट्टींची वेबसाईट पाकड्यांकडून हॅक!)
याआधी प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब
याआधी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लेटरबॉम्ब टाकत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल, तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल, अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना असल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले होते. तसेच गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी चर्चा केल्यानंतर “काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात. मात्र आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने, काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी “महाविकास आघाडी” स्थापन केली की काय? अशी चर्चा असल्याचे सरनाईक म्हणाले होते.
Join Our WhatsApp Community