अशी ‘पत्रं’ जी महाविकास आघाडीसाठी ठरली ‘विस्फोटक’!

पत्रांचं हे सत्र असंच सुरू राहिलं तर महाविकास आघाडीत वितुष्ट तर येणार नाही ना?

पत्रास कारण की… साधारणपणे कुठल्याही पत्रलेखनाची सुरुवात ही अशीच होते. आता पत्र आणि पोस्टमन काका यांचं एक समीकरण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पोस्टमन… अशी दारातून पोस्टमन काकांची नुसती हाक जरी आली, तरी पूर्वी लोकांना देवदूतंच आल्यासारखं वाटायचं. कारण आपल्या माणसांची चांगली, वाईट बातमी त्यांच्यामार्फतच कळायची. मग एखाद्या पत्रात थकीत बिलाचा तगादा असायचा किंवा एखाद्या पत्रात नाजूक हातांनी लिहिलेला दिलाचा तगादा. एखादं पत्र सुवेराचा आनंद घेऊन यायचं तर एखादं घराला सुतकात टाकायचं. शाळेत सुद्धा मोजक्याच मार्कांना का होईना पण पत्रलेखन असायचं.

हल्ली आपल्याला आलेल्या स्मार्टनेसमुळे पत्रव्यवहार जरा आऊटडेटेड झालेला आहे. पण राजकारणात कुठलीही गोष्ट आजही पत्रव्यवहरांद्वारेच केली जाते. याचा अर्थ असा नाही की राजरकारणी स्मार्ट नाहीत. पण शेवटी राजकीय प्रोटोकॉलपुढे कोणाचंही काही चालत नाही. पण ही पत्र बाँबही फोडतात, हा मात्र अलिकडेच आपल्याला झालेला साक्षात्कार आहे. आपण जर का थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये गेलो, तर राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळातली अनेक पत्र अशी आहेत, ज्यांनी सरकारला मोठे धक्के दिले आहेत. यामुळे मंत्रीसुद्धा गोत्यात आले. आता तर भाजपशी युती करण्यासाठी शिवसेना आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यामुळे, या काळातही पत्रांचं महत्त्व आपल्याला जाणवतंय.

कोट्यावधींचे ‘पत्र’

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली कार आणि त्यानंतर मनसुख हिरेन याची हत्या प्रकरणात मुंबई पोलिस दलातील सचिन वाझे यांच्याभोवती संशयाची सुई फिरू लागली. त्यानंतर एकंदरीतच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे, असे आरोप व्हायला लागले. त्यामुळे तत्त्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्त्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची तडकाफडकी बदली केली. परमबीर यांच्याकडून अक्षम्य चूका झाल्याचे गृहमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले. पण हे त्यांच विधानंच त्यांची सगळ्यात मोठी ‘चूक’ ठरली, ज्यामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. कारण त्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात थेट देशमुखांवरच 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला. तेव्हा मात्र ठकरे सरकार चांगलेच अडचणीत आले. इथे कुंपणंच शेत खातंय, असे आरोप या सरकारवर होऊ लागले. याचा परिणाम म्हणून अखेर अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

(हेही वाचाः परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… गृहमंत्र्यांवर केले धक्कादायक आरोप!)

दुसरे अनिलही सापडले पत्राच्या कात्रीत

परमबीर सिंग यांच्या लेटर बाँबनंतर सचिन वाझेनेही एनआय कोठडीत धमाका केला. एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझेने एनआयएला एक पत्र लिहिले. ज्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे पुन्हा एकदा एका पत्राने ठाकरे सरकारमधले एक मंत्री अडचणीत आले. हे आरोप खोटे असल्याचे अनिल परब यांनी सांगितले असले, तरी तेव्हापासून त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे, तो अजून काही संपत नाही.

(हेही वाचाः दोन ‘अनिल’ रडारवर, ठाकरे सरकार ‘गॅस’वर!)

सरनाईकांचा ‘पत्र’प्रताप

या सर्व पत्रांच्या वर कळस म्हणून की काय, ईडीच्या तावडीत सापडलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहित शिवसेनेतील नेत्यांची नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी या पत्रातून केला. तसेच शिवसेना फोडण्याचा डाव या दोन्ही पक्षांनी मांडला असून, असे होत असल्यास आपण भाजपशी सूत जमवलेले बरे, असे त्यांनी या पत्रातून म्हटले. यामुळे  प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी गुण्या गोविंदाने नांदत असल्याचं चित्रं निर्माण केलं जात असलं तरी ज्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत त्याच पक्षातील नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त करत आघाडीतली बिघाडी समोर आणली आहे. यानंतर मात्र भाजप-शिवसेना पुन्हा आपला संसार थाटणार का, अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

(हेही वाचाः सरनाईकांचा ‘पत्र’प्रताप… म्हणाले, शिवसेनेने भाजपशी जुळवून घेतलेले बरे!)

तसे जर का झाले, तर आरोपांच्या पत्रांचं हे सत्र असंच सुरू राहिलं तर महाविकास आघाडीत वितुष्ट तर येणार नाही ना, असाही एक प्रश्न आता निर्माण होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here