दुकानांच्या पाट्या मराठीत : उरले फक्त पाच दिवस

105

मुंबईतील दुकानांच्या पाट्या देवनागरी भाषेत अर्थात मराठी भाषेत करण्यासाठी सर्व दुकानदार आणि व्यावसायिकांना ३० जून २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व दुकानदारांसमोर शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिले असून अद्यापही दुकानदारांकडून मराठी पाट्या लावण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या हालचाली झालेल्या नाही. त्यामुळे दुकानदारांकडून आणखी काही दिवस मुदतवाढ मागण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा या धनशक्तीपुढे झुकते की कारवाईचे शस्त्र बाहेर काढून मराठीतील पाट्या लावण्यास भाग पाडते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मुंबईतील मराठी नामफलकासाठी मद्य विक्रीची दुकाने व मद्य पुरविण्यात येणाऱ्या आस्थापनांव्यतिरिक्त इतर दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी ३१ मे २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. जर ३१ मेपर्यंत या पाट्या मराठीतून न केल्यास पुढील १५ दिवसांत सर्व्हे करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. व्यावसायिकांच्या मागणीनंतर ही मुदत वाढवून देत ३० जून २०२२ पर्यंत करण्यात आली आहे.

(हेही वाचा Hindusthan Post Impact : महाविकास आघाडी सरकारच्या ‘जीआर’चा मुद्दा पहिला ‘हिंदुस्थान पोस्ट’नेच उजेडात आणला!)

एक महिन्याची मुदत वाढवून दिलेली 

महाराष्ट्र शासनाद्वारे ‘महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४, दिनांक १७ मार्च २०२२’ अन्वये ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२२’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अधिनियमाचे कलम ३६ क (१) च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम ७ लागू आहे, त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असला पाहिजे. याबाबतची अधिसूचना एप्रिल महिन्यात प्रसिद्ध करून महापालिकांना याबाबतचे निर्देश दिले होते. त्यामुळे पहिल्या दीड महिन्यात अर्थात दिलेल्या मुदतीत महापालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाला दुकानांच्या पाट्या मराठीत करून न घेतल्याने महापालिकेने एक महिन्याची मुदत वाढवून दिली होती.

काय आहेत अटी?

मराठी भाषेतील अक्षरलेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font Size), इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असता कामा नये, म्हणजेच मराठी टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेपेक्षा मोठ्या आकारात असणे आवश्यक आहे. अधिनियमातील या तरतुदींच्या अनुषंगाने, मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबई महानगरातील सर्व व्यापा-यांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की, अधिनियमाच्या सदर तरतुदीनुसार, आपल्या दुकाने / आस्थापनांवरील नामफलक प्रथमदर्शनी मराठी देवनागरी लिपीत व इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा मोठ्या आकारात दिसेल, अशारितीने प्रदर्शित करावा, अशा प्रकारच्या अटींचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.