लस तुटवड्याच्या नावाखाली महापालिकेसह सरकारचे ‘दबावतंत्र’?

खरोखरच लससाठा कमी आहे की, केंद्र सरकार विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी याचा कांगावा केला जात आहे, याबाबत आता मुंबईकरांना प्रश्न पडू लागले आहेत.

196

मुंबईत पुढील तीन दिवस लसीकरण बंद असून, लसींच्या तुटवड्याबाबत मोठे राजकारण होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने मुंबईत लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना केवळ दुसरा डोस दिला जाईल, असे जाहीर केले. पण त्याच रात्री लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर, गुरुवारी दुपारी १२ वाजता लसीकरण सुरू झाले. पण त्यानंतर दुपारी तीन वाजताच पुन्हा लस साठा उपलब्ध नसल्याचे रडगाणे गात पुढील तीन दिवसांकरता लसीकरण केंद्रे बंद ठेवली. त्यामुळे खरोखरच लससाठा कमी आहे की, केंद्र सरकार विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी याचा कांगावा केला जात आहे, याबाबत आता मुंबईकरांना प्रश्न पडू लागले आहेत.

लसीकरणाची आंधळी कोशिंबीर

मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत महापालिका व शासनाच्यावतीने ६३ लसीकरण केंद्रं आणि खासगी रुग्णालयात ७३ अशाप्रकारे एकूण १३६ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पण महापालिकेने २८ एप्रिल रोजी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर करुन केवळ दुसऱ्या डोससाठीच मर्यादित साठा शिल्लक राहिल्याचे सांगितले. तसेच ७३ पैकी ४० खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार नसल्याचे जाहीर केले. तर उर्वरित ३३ केंद्रांवर केवळ दुसऱ्या डोसचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती दिली. मात्र, रात्री उशिरा लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवून महापालिका व खासगी केंद्रांवर लस साठ्याचे वितरण सुरू होईल असे म्हटले होते. त्यानंतर रात्री उशिरा साठा उपलब्ध झाल्याची माहिती प्रशासनाने माझी मुंबई, आपली बीएमसी या ट्विटर हँडलवर दिली. लसीकरणासाठी शासकीय व महापालिकेच्या कोविड लसीकरण केंद्र तथा रुग्णालयांमध्ये कोविशिल्डचा साठा उपलब्ध झाल्याची माहिती दिली. त्यामुळे सर्व शासकीय व महापालिका लसीकरण केंद्रे गुरुवारी दुपारी १२ नंतर सुरू होतील, असे त्यात नमूद केले होते.

(हेही वाचाः मुंबईत लसींचा साठा पूर्ववत… दुपारी 12 पासून लसीकरण सुरू होणार)

सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न?

महापालिकेने गुरुवारी ही केंद्र सुरु केली आणि दुपारीच महापौरांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना महिती देत पुढील तीन दिवसांसाठी लससाठा नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यानंतर महापालिकेच्यावतीने संध्याकाळी प्रसिध्दी पत्रक जाहीर करण्यात आले. त्यामुळे महापालिकेकडे हा साठा नसतानाही तसेच जनतेला आवाहन केल्यानंतर पुन्हा केंद्र सुरू का केली. तसेच रात्री उशिरा किती लससाठा उपलब्ध झाला, याचीही माहिती प्रशासनाकडून देण्यात येत नाही. विशेष म्हणजे आजवर सरासरी ४५ हजार एवढे लसीकरण होत असताना, २७ एप्रिल रोजी सर्वाधिक ७२ हजार ६०६ एवढे लसीकरण झाले. त्यामुळे मिळालेल्या लसींचा साठा संपवून, मुंबई महापालिका पुन्हा हात पुढे करत आहे. पण महापालिकेकडे सध्या लसीकरणाचे कोणतेही नियोजन नसल्यानेच हा प्रकार घडत असून वारंवार लससाठा उपलब्ध नसल्याची कारणं देत एकप्रकारे सरकारवर दबाव आणायचा आणि दुसरीकडे आपल्या झोळीत लससाठा पाडून घ्यायचा, असाच प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.

गणित कुठे चुकतंय?

मुंबईत २९ एप्रिलपर्यंत एकूण २४ लाख २८ हजार ६२६ एवढे लसीकरण पार पडले. मुंबईत २५ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण २४ लाख ५८ हजार ६०० एवढ्या लसी उपलब्ध झाल्या. यापैकी २४ लाख १० हजार ८६० लस उपयोगात आल्या असल्याचा दावा प्रशासनाने केला होता. तसेच २८ एप्रिल दुपारपर्यंत ४७ हजार ७४० लससाठा शिल्लक होता, असे प्रशासनाने म्हटले होते. पण त्याच दिवशी रात्री पुन्हा लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर २९ एप्रिल रोजी २८ हजार ७८२ एवढे लसीकरण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे २५ एप्रिलपर्यंत उपलब्ध असलेला साठा आणि २९ एप्रिलपर्यंत झालेले लसीकरण याची बेरीज, वजाबाकी केल्यानंतर प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मदतीने कशाप्रकारे हातचलाखी करते हे समोर येत आहे.

(हेही वाचाः शुक्रवारपासून तीन दिवस मुंबईतील लसीकरण बंद!)

देशात सध्या सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्रात होत असून, मुंबईत सर्वाधिक लसीकरण झालेले आहे. त्याखालोखाल पुणे व ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे मिळालेल्या लसीकरणाचे नियोजन न करता वारंवार केंद्रं बंद करुन लस तुटवड्याच्या नावाने सरकार महापालिकेला हाताशी धरुन दबावतंत्र राबवत असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.