केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ही जागा भाजपा लढवणार का, मग श्रीकांत शिंदे कुठून लढणार, असेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत. या सर्व घडामोडींचा मागोवा घेतल्यानंतर ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे सलग दोन वेळा कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. एकीकडे या मतदारसंघावर त्यांची पकड घट्ट झाली असताना, भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी येथे येऊन पक्षविस्तार मोहीम हाती घेतल्यामुळे शंकेस जागा उत्पन्न झाली आहे.
याविषयी शिंदे गटातील अंतर्गत सूत्रांशी चर्चा केली असता, कल्याणची जागा भाजपाला सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. याउलट ठाण्याची जागा राखण्यासाठी नियोजन केले जात आहे. राजन विचारे शिंदे गटात येण्याची शक्यता नसल्याने त्यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार द्यावा लागणार आहे. प्राप्त परिस्थितीत श्रीकांत शिंदे यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव समोर नसल्याने, त्यांनी ठाण्यातून लोकसभा निवडणूक लढवावी का, यादृष्टीने चाचपणी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंनी मैदान राखले; शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी)
ठाणे की कल्याण आव्हानात्मक?
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. केवळ संजीव नाईक यांचा अपवाद वगळता गेल्या कैक निवडणुकांत ठाणेकरांनी शिवसेनेच्या खासदाराला कौल दिला आहे. आता शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे परिस्थिती बदलली. आजमितीला ठाण्यातील बहुतांश शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे आहेत. शिवाय ९० टक्के नगरसेवकांसह तीन आमदार (एक अपक्ष) शिंदे गटात आहेत. संजय केळकर आणि मंदा म्हात्रे युतीमुळे शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याणच्या तुलनेत ठाणे लोकसभा मतदारसंघ अधिक सुरक्षित असल्याचे शिंदे गटातील वरिष्ठांचे मत असल्याचे कळते.
Join Our WhatsApp Community