कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाला तरी राज्यात मुख्यमंत्री कुणाला करायचे यावर निर्णय घेताना मात्र काँग्रेस हायकमांडची गोची झाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून चार दिवस झाले, पण अद्याप काँग्रेसला आपला मुख्यमंत्री ठरवता आला नाही. चार दिवसांपासून काँग्रेस हायकमांडच्या बैठका सुरू असून, डीके शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्या नावावर एकमत होऊ शकले नाही. दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदावर ठाम आहेत. यात अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची चर्चा होत आहे. पण, शिवकुमार यांनी एक अट घातली आहे.
कर्नाटक मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अखेरपर्यंत डीके शिवकुमार यांची वरचढ पाहायला मिळत होती, पण अखेरच्या क्षणी सिद्धरामैय्या यांचे नाव पुढे आले. तसेच, पक्षाने डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदासह महत्वाची खाती देऊ केली आहेत. पण, शिवकुमार यावर समाधानी नाहीत. यातच आता अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा पुढे आली आहे. मात्र, शिवकुमार यांनी पहिले अडीच वर्षे त्यांना मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. डीके शिवकुमार यांनी हायकमांडला स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांना मुख्यमंत्रिपदाशिवाय दुसरे काहीही नको. पहिला अडीच वर्षांचा कार्यकाळ मला द्यावा तर दुसरा सिद्धरामय्या यांना द्यावा. अशी अट त्यांनी हायकमांडसमोर ठेवली आहे. डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस हायकमांड पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेणार आहे.
(हेही वाचा उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत ‘औरंगाबाद’ हेच नाव, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश)
Join Our WhatsApp Community