धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेची जागा प्राप्त करण्याकरिता रेल्वे मंत्रालयाच्या रेल लँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकारणात मंगळवारी करार करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत ‘डेफिनेटिव्ह अॅग्रीमेंट’वर स्वाक्षरी करण्यात आली.
( हेही वाचा : सानुग्रह अनुदानाची घोषणा : २० दिवस उलटत आले तरी महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईना रक्कम)
या करारामुळे आशियातील सर्वांत मोठ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालेला आहे. या बैठकीसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडून हायस्पीड रेल्वे आणि हायस्पीड कार्गो रेल्वे सुरू करण्याच्या प्रस्तावावर सुद्धा यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करण्यात आली. याबाबत सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले.
मुंबई ते सोलापूर मार्गावर ‘वंदे भारत’ रेल्वे
खा. जयसिद्धेश्वर स्वामी महाराज आणि खा. रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी मुंबई ते सोलापूर मार्गावर ‘वंदे भारत’ रेल्वेसंदर्भात विनंती केली होती. ती मागणी सुद्धा यावेळी अश्विनी वैष्णव यांच्यापुढे मांडली असता याबाबत सकारात्मक विचार करण्याचे अभिवचन रेल्वेमंत्र्यांनी दिले. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आढावा घेताना आणि पुढील चर्चा करताना याबाबत ‘रेल कम रोड’ प्रकल्पाचा विचार व्हावा, असा एक प्रवाह पुढे आला. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकार पुढील निर्णय घेईल, असे सांगितले.
Join Our WhatsApp Community