लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक जागा महाविकास आघाडीला मिळाल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना उबाठाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. परिणामी, प्रत्येक पक्ष विधानसभेसाठी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने या आघाडीत फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Mahavikas Aghadi)
सांगलीच्या पैलवानाने भरला दोन्ही काँग्रेसना दम
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदार संघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला आणि महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील पाच लाखांहून अधिक मतांनी पडले. त्यामुळे बिथरलेल्या चंद्रहार पाटील यांनी आता आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला असून खानापूर आणि मिरज या दोन विधानसभा जागा शिवसेना उबाठा कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांनी लोकसभेला उबाठासोबत गद्दारी केली असा आरोप करत अशी गद्दारी परत केली तर त्याची किंमत पूर्ण महाराष्ट्रात त्यांना मोजावी लागेल, असा सज्जड दमही डबल केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दोन्ही काँग्रेसला दिला. (Mahavikas Aghadi)
(हेही वाचा – Praful Patel : राज्यसभेनंतर मंत्रीपदासाठी देखील राष्ट्रवादीत रस्सीखेच)
पुण्यात राष्ट्रवादी (शप)-उबाठा गटात जुंपली
महाविकास आघाडीत पुणे आणि सांगली जिल्ह्यातील जागांचा वाद तर चव्हाट्यावर आला असून अन्य जिल्ह्यात हे लोण पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील आठपैकी सहा जागांवर आपला दावा सांगितला आहे तर उबाठाने त्यातील सहा जागांची मागणी पुढे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुण्यातील पर्वती, हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी या आपल्याच असल्याचे सांगत पण शिवाजी नगर आणि पुणे कॅन्टोनमेंट या जागांची मागणीही केली आहे. (Mahavikas Aghadi)
उबाठाचा सहा जागांवर दावा
तर शिवसेना उबाठा शहरप्रमुख संजय मोरे यांनीही वडगाव शेरी, कोथरूड, हडपसर, कसबा पर्वती आणि पुणे कॅन्टोनमेंट या सहा विधानसभा जागांची मागणी उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे सांगितले. पुण्यातील जनतेची मागणी आहे म्हणून आपण या मतदार संघांची मागणी केल्याचेही मोरे यांनी स्पष्ट केले. (Mahavikas Aghadi)
काँग्रेसचा दोन्ही गटांना टोला
दरम्यान, काँग्रेसचे पुणे कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दोन्ही गटांना, राष्ट्रवादी (शप) आणि उबाठा, टोला हाणत सगळ्यांनीच २८८ पैकी २८०-२८० जागा मागीतल्या तर जागा शिल्लकच राहणार नाहीत असे सांगितले. त्यामुळे पुण्यावरून तरी आघाडीत फूट पडणार हे स्पष्ट झाले आहे. (Mahavikas Aghadi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community