‘सिल्वर ओक’वरील हल्ल्याच्या आधी सदावर्तेंच्या घरी झाली बैठक

145

संपकरी राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनाही शुक्रवारी, ८ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी हल्ला केला. या आधी गुरुवारी, ७ एप्रिल रोजी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती, अशी महत्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सच्चिदानंद पुरी याच्या जबानीतून ही माहिती हाती लागली आहे. पोलिसांनी ही माहिती न्यायालयात सादर केली आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आरोपी मोबाईलचे लॉक द्यायला तयार नाहीत 

हल्ला प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी अटक केलेले ८ आरोपी हे सदावर्ते यांचे निकटवर्ती आहेत. त्यांना बुधवार, १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांनी त्यांचे फोन याआधीच जप्त केले आहेत. त्यामध्ये अभिषेक पाटील, सविता पवार, महंमद ताजुद्दीन इत्यादींचा सहभाग आहे. ‘सिल्वर ओक’च्या निवासस्थानाकडील सीसीटीव्ही तपासले आहेत. या आरोपींनी आंदोलकांना पवारांचा बंगला कोणता आहे आणि तिथपर्यंत कसे पोहचायचे हे दाखवण्यासाठी मदत केली आहे. परंतु या सर्व आरोपींचे मोबाईल लॉक केले आहेत आणि त्यांचे पासवर्ड ते पोलिसांना देत नाहीत. त्यामुळे अधिकची माहिती घेण्यास विलंब होत आहे. म्हणून या सर्वांकडून अधिकची माहिती घेण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात केली आहे, ही मागणी मान्य करत बुधवार, १३ एप्रिलपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

(हेही वाचा ‘सिल्वर ओक’ वर झालेला हल्ला हे राजकीय षडयंत्र)

हल्ल्याची रूपरेखा आधीच ठरली 

पोलिसांनी सच्चिदानंद पुरी यालाही ताब्यात घेतले आहे. हा आरोपी युट्युब चॅनल चालवतो, त्याच्या चौकशीतून महत्वाची माहिती उघड झाली आहे. ७ एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात जी बैठक झाली होती. त्या ठिकाणी सिल्वर ओकवर हल्ला कारण्याची रूपरेखा आखण्यात आली होती. त्यामुळे या आरोपींच्या जबानीतून या हल्ल्यात थेट गुणरत्न सदावर्ते यांचा सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच राज्यभरात विविध प्रक्ररणात सदावर्ते यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यासाठी पोलिसांनी सदावर्ते यांची पोलीस कोठडी हवी आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.