मंत्रालयातील महसूल विभागात शरद पवारांचा हुबेहूब आवाज काढून सिल्वर ओक वरून बोलत असल्याचे बदली संदर्भात सचिवाला सूचना देणाऱ्या दोन जणांना खंडणी विरोधी पथकाने पुण्यातून अटक केली आहे. या दोघांनी ‘स्फुफिंग सॉफ्टवेअर’चा वापर करून शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ बंगल्याचा दूरध्वनी क्रमांक हॅक करून कॉल केल्याचे दोघांच्या चौकशीत समोर आले आहे. एवढ्या मोठ्या नेत्याच्या बंगल्याचा दूरध्वनी हॅक करणाऱ्या या दोघांनी आणखी किती जणांची याप्रकारे फसवणूक केली आहे, तसेच या दोघांना बदलीसाठी कोणी फोन करायला सांगितले व त्या मोबदल्यात यांनी किती पैसे घेतले याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अधिकाऱ्याला शंका आली!
मंत्रालयातील महसूल विभागातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला बुधवारी लँडलाईन नंबरवर फोन आला होता, ‘मी सिल्वर ओक वरून शरद पवार बोलतोय, त्या अधिकाऱ्याच्या बदलीचे काय ते बघून घ्या’ असे सचिवाला सांगण्यात आले होते. या सचिवाने मोबाईल नंबर तपासला असता त्याच्यावर सिल्वर ओक असे लिहून आले होते व आवाज देखील शरद पवारांचा हुबेहूब होता. मात्र या अधिकाऱ्याच्या मनात पाल चुकचुकली. एका कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी पवार साहेब थेट कशाला फोन करतील?, कुठल्याही व्यक्तीकडून निरोप पाठवला असता, तरी काम झाले असते, असे या अधिकारी यांना वाटले आणि या अधिकाऱयाने खात्री करण्यासाठी सिल्वर ओकवर कॉल केला असता साहेब मुंबईत वसुल दिल्लीला आहे, असे उत्तर त्यांना देण्यात आले.
(हेही वाचा : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती आहे शिक्षणसम्राट मंत्री? भातखळकरांनी जारी केली यादी…वाचा…)
दोघांना ताब्यात घेतले!
या अधिकाऱ्याचा संशय खरा ठरला आणि या अधिकाऱ्याने थेट मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली. प्रकरण गंभीर असल्यामुळे तपासासाठी गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने प्रथम गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून आलेला फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला असता सादर फोन हा पुण्यातील जेऊर येथून आल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी वेळ न दडवता पुण्यातील जेऊर येथून किरण काकडे आणि विकास गुरव या दोघांना ताब्यात घेऊन मुंबईत आणले, या दोघांकडे कसून चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत हा कॉल आम्हीच केला होता ते पोलिसांना सांगितले.
असा होतो नंबर हॅक
सिल्वर ओक बंगल्याचा लँडलाईन नंबर ‘स्फुफिंग सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून हॅक करून शरद पवार यांचा आवाज काढून विकास गुरव याने कॉल केल्याचे समोर आले. मात्र हा कॉल कोणी करायला सांगितला, त्यासाठी किती पैसे देण्यात आले, याबाबत चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ‘स्फुफिंग सॉफ्टवेअर’ हे फोन नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस हॅक करण्यासाठी वापरला जातो. इंटरनेटच्या सहाय्याने हे सॉफ्टवेअर वापरले जाते. एखाद्याचा मोबाईल नंबर हॅक या ‘स्फुफिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅक करून समोरच्याला कॉल केला असता त्याच्या कॅलरी आयडी वर हॅक केलेला क्रमांक दिसून येतो. फसवणुकीचा याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता.
Join Our WhatsApp Community