चिपी विमानतळाला पुन्हा नवा मुहूर्त मिळाला! यावेळी विनायक राऊतांनी केली घोषणा!

काही महिन्यांपूर्वी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र त्याची कल्पना ना सेनेच्या आमदारांना होती ना खासदारांना होती.

चिपी विमानतळ…मागील वर्षभरापासून या चिपी विमानतळाच्या मुहुर्ताच्या तारखांवर तारखा येत असून, आता चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची पुन्हा नवी तारीख समोर आली आहे. येत्या गणेशचतुर्थीपूर्वी चिपी विमानतळावरुन विमान प्रवास सुरु होईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आमदार दिपक केसरकर यांच्यासोबत चिपी विमानतळाची पाहणी केली आहे. यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.

गणेशचतुर्थीपूर्वी विमान प्रवास सुरु!

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळावरून गणेशचतुर्थीपूर्वी विमान प्रवास सुरु होणार आहे. काही महिन्यांपूर्वी डीजीसीए आणि एअरपोर्ट अथॉरिटीने ज्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या, त्याचे तंतोतंत पालन करुन आता एअरपोर्ट वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. यासाठी जवळपास तीनशे ते साडेतीनशे कर्मचारी तसेच पंजाबवरुन मशिनरी आणि बाहेरून इतर टेक्नॉलजी मागवली होती. त्यांनी रनवेच्या पुर्नबांधणीचे  काम व्यवस्थित केले आहे. त्याचा रिपोर्ट आयआरबी कंपनीने डीजीसीएकडे पाठवला आहे, असे विनायक राऊत म्हणाले.

याआधी दोन वेळा मुहूर्त हुकला!

याआधी २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून चिपी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार, अशी आय.आर.बी. कंपनीने माहिती दिली होती. तर या विमानतळाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र या दोन्ही तारखांना चिपी विमानतळाचे उद्घाटन होऊ शकले नाही. त्यामुळे आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे ‘यंदा तरी बाप्पा पावतलो काय’, असा प्रश्न आता चाकरमान्यांना पडला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे काही महिन्यांपूर्वी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र त्याची कल्पना ना सेनेच्या आमदारांना होती ना खासदारांना होती. तसेच त्या पत्रिकेबद्दल अनभिज्ञ आहोत, असा दावा पालकमंत्री उदय सामंत यांनी केला होता.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here