मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील 40 आमदारांनी उठाव करत भाजपच्या साथीन राज्यात सत्तांतरण घडवून आणले. या सर्व राजकीय परिस्थितीमुळे राज्याच्या राजकारणाला मोठे हादरे बसले. पण आता यामध्ये आता आणखी एका नव्या भूकंपाची शक्यता असून काँग्रेसचा एक गट देखील शिंदे गटात सामील होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इतकंच नाही तर शिंदे-फडणवीस सरकारच्या दुस-या मंत्रिमंडळात काँग्रेसमधील काही नेत्यांना देखील स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. असे झाल्यास राज्याच्या राजकारणात पुन्हा एक नवीन वादळ उठण्याची चिन्हे आहेत.
(हेही वाचाः ‘एक’ साहेब आणि ‘एक’नाथ साहेब…विचारांचा वारसा ‘क्लिक’ झालाय, मनसेचे सूचक ट्वीट)
काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह
राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसला होता. पण या सरकारमध्ये आपल्याला दुय्यम स्थान देण्यात असल्याच्या तक्रारी अनेकदा काँग्रेस आमदार आणि मंत्र्यांकडून करण्यात येत होत्या. तसेच काँग्रेसमध्ये देखील अंतर्गत धुसफूस असल्याचे सांगण्यात येत होते. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे दुसरे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी ही उघड झाली होती. त्यामुळे काँग्रेसमधील नाराजांचा हा गट फूटून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे गटात सामील होऊ शकतो, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.
मंत्रिमंडळात स्थान मिळणार?
दरम्यान, गणेशोत्सवानंतर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नव्याने होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसमधील नाराज आमदार जर शिंदे गटात सहभागी झाले तर या आमदारांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community