संपात फूट! ९ हजार एसटी कामगार रुजू

90

राज्य परिवहन मंडळाच्या कामगारांना ४१ टक्के वेतनवाढ दिल्यानंतर संपाला सक्रिय पाठिंबा देणाऱ्या भाजपने माघार घेतली. मात्र एसटी कामगारांनी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहून संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कामगारांना शुक्रवार सकाळपर्यंत अल्टिमेटम दिला. त्याप्रमाणे महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार राज्यभरातील २१ आगार अंशतः सुरु झाले असून ९ हजार ७०५ कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत.

महामंडळाचे काम सुरु होताच राज्यभरातील विविध आगारांमध्ये कर्मचारी रुजू झाले. एकूण ९ हजार ७०५ कामगार सेवेत पुन्हा रुजू झाले. त्यातील ६ हजार ४८२ कर्मचारी हे कार्यालयीन कर्मचारी आहेत. महामंडळाच्या विविध विभागातून संप हळूहळू पूर्वपदावर येत आहे, अशी माहिती महामंडळाने दिली आहे. सांगली, मिरज, कवठे-महाकाळ, जत, पेण, महाड, पालघर, चंदगड, कल्याण, स्वारगेट, राजापूर, देवरुख, रत्नागिरी या आगारांमधून काही प्रमाणात एसटीच्या गाड्या बाहेर पडल्या.

(हेही वाचा 26/11…मुंबईत दहशतवादाने पहिले पाऊल कधी टाकले?)

वसईमधून पहिली एसटी रस्त्यावर 

पालघर जिल्ह्यातही अंतर्गत परिवहन व्यवस्था ही एसटीवर अवलंबून आहे. त्यामुळे या जिल्ह्यात एसटी वाहतूक सुरु होणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे वसई आगारातून पहिली बस गाडी बाहेर पडली.  त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला.

परळ आगारात मात्र शुकशुकाट 

मुंबईतील परळ आगारात मात्र अद्याप एकही कामगार कामावर परतला नाही. त्यामुळे परळ आगारातील सर्वच्या सर्व बस गाड्या आगारातच होत्या. एकही एसटी गाडी बाहेर पडली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.