शिवसेना चालते राष्ट्रवादीच्या ‘घड्याळाच्या काट्यावर’

84

शिवसेनेची दोन छकले पडल्यानंतर अस्थिर झालेल्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नवसंजीवनी देण्याचे काम पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे करत असले तरी प्रत्यक्षात शिवसेना घड्याळाच्या काट्यावरच चालत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेला आजच्या घडीला राष्टवादीच्या घड्याळाचे काटेच पुढे घेऊ जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे,सचिन अहिर, भास्कर जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक खासदार संजय राऊत हेच शिलेदार शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटेच शिवसेनेचे टायमिंग साधण्याचा प्रयत्न करत अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

( हेही वाचा : दोन वर्षांपर्यंतच्या २० हजार बालकांचे गोवर लसीकरणच नाही!)

मागील २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत वरळीतील माजी मंत्री व आमदार सचिन अहिर आणि माजी मंत्री व आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ईशान्य मुंबईचे माजी खासदार असलेले राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. ही निवडणूक शिवसेना भाजप युतीत लढली गेली तरी प्रत्यक्षात निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपशी फारकत घेत प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. हे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रयत्न केले. परंतु संजय राऊत हे शिवसेना नेते असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मानस पुत्र म्हणून त्यांची ओळख आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर समर्थक मानले जात आहे. तर महाविकास आघाडीचे सरकार गडगडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशाऱ्यानंतरच त्यांचे स्टार प्रचारक असलेल्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

नेमकी हीच मंडळी आता दुभंगलेल्या शिवसेनेला अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत तुरुंगात असताना सचिन अहिर हे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यापाठिशी सावलीसारखे उभे राहिले. त्यानंतर राऊतांप्रमाणे शिवसेनेची तोफ बनून सुषमा अंधारे यांनी जे ४० बंडखोर आमदार होते, त्यांच्या मतदार संघात जावून त्यांचा समाचार घेत शिवसेनेची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत एकप्रकारे शिवसैनिकांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाने दिलेल्या उपनेत्याची भूमिका ते पार पडत असून त्यांचे दुसरे सहकारी असलेले भास्कर जाधव यांना शिवसेनेने नेतेपदी बढती दिल्यानंतर त्यांनीही शिवसेनेची घडी पुन्हा मजबूत करण्यासाठी मेळावे आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता राऊत हे जेलमधून जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा एकदा शिवसैनिकांना आधार देत पक्षाची बाजू अधिक मजबूत आणि भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे ईशान्य मुंबईतील शिवसैनिक शिंदे गटात जावू नये यासाठी राष्ट्रवादी माजी खासदार संजय दिना पाटील हे भिंत बनून उभे आहेत. त्यामुळे एकप्रकारे शिवसेनेला अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीतून आलेले आणि राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक हेच खिंड लढवताना दिसत आहेत.

राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले आमदार दिपक केसरकर आणि उदय सामंत यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री बनले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे काही नेते शिवसेनेत आधीच पाठवत शरद पवार यांनी शिवसेनेला आधीपासून मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता हा पक्ष फुटल्यांनतर आपल्याच सैनिकांची फौज तयार करून ते शिवसेनेला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आपल्या नेत्यांचे स्थानही पक्षात मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.