गांधी घराण्याचे सदस्य सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी हे देशभरात मतदारांना काँग्रेसला (Congress) मते द्या असे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सांगत फिरणार; पण प्रत्यक्षात मात्र स्वतः काँग्रेसला मत देणार नाहीत. 140 वर्षांच्या इतिहासात गांधी कुटुंबावर ही वेळ पहिल्यांदाच आली आहे. कारण काँग्रेसने दिल्लीत आपसोबत युती केली आहे आज्या ज्या मतदारसंघाचे गांधी घराण्याचे हे सदस्य मतदार आहेत, त्या ठिकाणी उमेदवार काँग्रेसचा नसून आप चा असणार आहे.
स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या काँग्रेस (Congress) पक्षावर यावेळेस आम आदमी पक्षासोबत हात मिळवणी करण्याची वेळ आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामुळेच काँग्रेसला दिल्लीची सत्ता गमवावी लागली होती. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्याशीच आघाडी करावी लागली आहे. भाजपाविरोधी राजकीय पक्षांनी इंडी आघाडी बनविली आहे. देशाची राजधानी दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात आघाडी झाली आहे. या समझोत्यानुसार, देशाची सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसला आता अवघ्या तीन जागांवर उमेदवार उतरविता येणार आहे. उर्वरित जागा केजरीवाल यांच्या पक्षाकडून लढविल्या जाणार आहेत. यामुळे गांधी कुटुंबाचे सदस्य या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करू शकणार नाहीत. 140 वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडणार आहे. काँग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी या काँग्रेसला मतदान करू शकणार नाहीत.
देशाची सत्ता सर्वाधिक काळ उपभोगणारा काँग्रेस पक्ष आता क्षेत्रीय पक्षांच्या मदतीवर अवलंबून आहे. ज्या मतदारसंघात काँग्रेसची (Congress) थेट लढत भाजपशी आहे, तेथे परिस्थिती ठीक आहे. परंतु, ज्या ठिकाणी लढत तिरंगी आहे किंवा तिसरा पक्ष मैदानात आहे तेथे काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाल्यासारखी दिसून येते. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, बंगाल, त्रिपुरा, ओडिशानंतर दिल्लीतही काँग्रेसची अवस्था वाईट आहे.
दिल्लीत काँग्रेस आणि ‘आप’ची आघाडी
देशाची राजधानी दिल्लीत मागच्या 10 वर्षांपासून काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. यामुळे लोकसभेच्या या निवडणुकीत काँग्रेसने आपसोबत आघाडी करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत लोकसभेच्या एकूण सात जागा आहेत. यातील चार जागा आप आणि तीन जागा काँग्रेस लढविणार आहे.
आप चार, काँग्रेस तीन जागांवर लढणार
आम आदमी पक्ष नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली आणि पश्चिम दिल्ली या जागा लढविणार आहे. तर चांदनी चौक, ईशान्य आणि उत्तर पश्चिम दिल्लीची जागा काँग्रेस (Congress) लढविणार आहे.
काँग्रेसने स्वप्नातही विचार केला नसेल
काँग्रेसचे मंडळी आपसोबत जेव्हा जागा वाटपाची चर्चा करीत होते तेव्हा त्यांना याची पुसटशी सुध्दा कल्पना नसेल की, त्यांचे नेते काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करू शकणार नाही. कारण सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचे मतदान नवी दिल्ली मतदारसंघात येते. आणि समझोत्यानुसार नवी दिल्लीची जागा आम आदमी पक्ष लढविणार आहे. आपने येथून सोमनाथ भारती यांना तिकीट दिले आहे. यामुळे गांधी कुटुंबातील तिन्ही सदस्यांना आता भारती यांना मतदान करावे लागणार आहे.
नवी दिल्ली काँग्रेसचा बालेकिल्ला
नवी दिल्लीचा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा एक प्रकारचा गडच. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने (Congress) सात वेळा विजय मिळवला आहे. या लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 10 जागा आहेत. या ठिकाणी काँग्रेसचे तिन्ही ज्येष्ठ नेते राहतात आणि मतदार आहेत. याशिवाय प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला हेही याच भागातील मतदार आहेत.
गांधी कुटुंबांचे मतदान केंद्र कुठे?
- सोनिया गांधी: निर्माण भवन, मौलाना आझाद रोड
- राहुल गांधी: अटल आदर्श विद्यालय, औरंगजेब लेन
- प्रियांका वाड्रा: अटल आदर्श विद्यालय, लोधी इस्टेट
- रॉबर्ट वाड्रा: विद्या भवन महाविद्यालय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, लोधी इस्टेट
Join Our WhatsApp Community