स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्योत्तर घटनांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण दिवस साजरे करतो. पण, ते दिवस कशासाठी योजिले आहेत, याचा विचार व्हायला हवा, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.
( हेही वाचा : धक्कादायक! मुंबईत दररोज २ अत्याचार आणि ४ अपहरणाच्या घटना )
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात म्हात्रे बोलत होते. यावेळी निवृत्त पोलीस महासंचालक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाहक राजेंद्र वराडकर, सहकार्यवाहक स्वप्नील सावरकर, विश्वस्त शैलेंद्र चिखलकर उपस्थित होते. ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या संविधान विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हात्रे म्हणाले, आज जगातील सहावा माणूस भारतीय आहे. जवळपास १४१ कोटी लोकसंख्येचा हा देश एका ग्रंथात बांधलेला आहे. या संविधानाने भारतीयांना जे आत्मबळ दिले आहे, त्याचे चिंतन करण्याचा हा दिवस आहे. इंग्लंड, अमेरिका, फ्रेंच यांसारख्या अनेक घटनांमधून चांगले ते घेण्याचा प्रयत्न आपण केला. संविधान निर्मिती झाली, त्यावेळीची लोकसंख्या ३५ कोटी होती. आता ती १४१ कोटींवर पोहोचली आहे, हा फरक लक्षात घेतला पाहिजे.
संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि सर्वंकष अधिकाराचे बळ आपल्या मनगटामध्ये दिले. परंतु, त्याचा फायदा देशातील सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचला का, याचा विचार करण्याची गरज आहे. एकीकडे भारताला महासत्ता बनवण्याची भाषा केली जात असताना, आजही आपल्याकडे दारिद्र्यरेषेखाली खंगत असलेला देश म्हणून पाहिले जाते. उपाशीपोटी झोपणारी सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. भारतीय संविधानाने आपल्याला शिक्षण, आरोग्य, उत्तम आयुष्य जगण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु, आजही देशातील ३५ कोटींहून अधिक लोकसंख्या यापासून वंचित आहे. मग आपण संविधान दिवस साजरा करण्यासाठी पात्र आहोत का, याचाही विचार व्हायला हवा, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले.
‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिल्या शुभेच्छा
‘हिंदुस्थान पोस्ट’ने केलेला हा प्रयत्न अतिशय चांगला आणि उपयुक्त आहे. पत्रकारांनी अभ्यासपूर्ण लेखन केले पाहिजे. समाजाचा प्रामाणिकपणे विचार करणारा पत्रकार हा एकमेव वर्ग आता शिल्लक राहिलेला आहे. सध्या सोशल मीडियावर पत्रकारांना झोडपण्याचे प्रचंड फॅड आलेले आहे. लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी पत्रकार हा एक दुबळा खांब आहे, ज्याच्याकडे काहीही नाही. त्यामुळे आपल्या समस्यांसोबत या देशातील नागरिकांच्या समस्या आपल्याला सोडवाच्या आहेत. त्यामुळे आपल्या अवतिभवतीच्या समस्या मांडत रहा. तुमच्या हातात ‘हिंदुस्थान पोस्ट’सारखे चांगले व्यासपीठ आहे. सामान्यांच्या हिताचा आवाज कितीही क्षीण असला, तरी त्याची दखल कधीना कधी घेतली जाते, हे ध्यानात घ्या. ‘हिंदुस्थान पोस्ट’ अधिक मोठे व्हावे, तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचा आवाज बुलंद होत रहावा, यासाठी शुभेच्छा, असेही म्हात्रे म्हणाले.
सावरकर केवळ स्वातंत्र्यवीर नव्हे, समाजक्रांतिवीर – स्वप्नील सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे आपण मुलभूत हक्क आणि भविष्यातला भारत, सावरकरांच्या स्वप्नातला भारत कसा असावा, याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नरत आहोत. ‘हिंदुस्थान पोस्ट’ हे त्यातले एक अस्र आहे. ते कसे वापरायचे, यासाठी महेश म्हात्रे यांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढे जाऊ. गरिबांना भाकरीतला चंद्र नव्हे, प्रत्यक्षातील चंद्र कसा दाखवता येईल, यासाठी काम करू, असे ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांनी आश्वस्त केले. सावरकरांचे जातिभेद मिटवायचे कार्य महान आहे. त्यामुळे सावरकरांना स्वातंत्र्यवीर या एकमेव पदवीने न ओळखता समाजक्रांतिवीर म्हणून त्यांची ओळख लोकांपुढे जायला हवी, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community