माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांवर मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी(विशेष तपास पथक) नेमण्यात आले आहे. दोन पोलिस उपायुक्तांच्या देखरेखीखाली या गुन्ह्याचा तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्यासह काही पोलिस अधिका-यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे गुन्हा?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अकबर पठाण, पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरके, संजय पाटील आणि दोन बांधकाम व्यवसायिक यांच्यावर मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात खंडणी, मारहाण करणे, बोगस दस्तावेज तयार करुन जमिनी बळकावणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बांधकाम व्यवसायिक संजय पुनमिया आणि सुनील जैन या दोघांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल याच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला.
(हेही वाचाः परमबीर सिंग यांच्यावर पुन्हा नवीन गुन्हा दाखल! अडचणी वाढणार)
यांचा आहे पथकात समावेश
गुन्ह्याची व्याप्ती आणि त्यात पोलिस अधिका-यांचा समावेश असल्यामुळे, या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले आहे. या एसआयटी मध्ये पोलिस उपायुक्त दर्जाचे दोन अधिकारी, एसीपी दर्जाच्या अधिका-यांसह १० ते १२ जणांचे पथक नेमण्यात आले आहे. पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास केला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community