मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या येत्या १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबाद येथील सभेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. असे असले तरीदेखील मनसे पदाधिकारी, मनसैनिक या सभेसाठी सज्ज आहेत. मनसैनिकांनी या सभेसाठी खास निमंत्रण पत्रिका देखील छापल्याचे माध्यमातून समोर आले आहे. या निमंत्रण पत्रिका घरोघरी जाऊन मनसे कार्यकर्ते वाटणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, औरंगाबादेत ही सभा कोणत्या जागेवर होणार, कोणत्या जागेवर ही सभा राज ठाकरेंना घेता येणार? या मुद्द्यावर राज्यात घमासान सुरू असताना मनसैनिक सज्ज असून त्यांनी या निमंत्रण पत्रिका घरोघरी वाटण्याचे नियोजन आखले आहे.
(हेही वाचा – ‘राज तिलक की करो तैयारी…’, बॅनरबाजी करत मनसेने सेनेला डिवचलं!)
राज ठाकरे हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेणार?
शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबादेत बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकत हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी राज ठाकरे येत्या १ मे रोजी औरंगाबादेत सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले आहे. दरम्यान, हिंदुत्वाचे मुद्दे आगामी सभेच्या निमंत्रण पत्रिकेतूनही स्पष्टपणे मांडण्याचे प्रयत्न मनसेकडून करण्यात आले आहेत. औरंगाबादेत खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच ही सभा होणार असून त्यासाठीच्या निमंत्रण पत्रिका वाटपाचे काम आता मनसेच्या वतीने सुरु करण्यात आले आहे.
अशी आहे निमंत्रण पत्रिका
मनसेच्यातर्फे राज ठाकरे यांच्या आगामी सभेची निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे. त्यावरून हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पुढचे पाऊल टाकणार असेच दिसते आहे. या पत्रिकेवर राज ठाकरेंनी भगवी शाल खांद्यावर घेतली असून पत्रिकेवर भगव्या झेंड्यावर हनुमानाची तस्वीर देखील दिसतेय. ही पत्रिका संपूर्ण भगवीमय असल्याचे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे या सभेत काय बोलणार? याकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
बाळासाहेबांच्या पावलावर राज ठाकरेंचे पाऊल?
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादमधील ऐतिहासिक सभादेखील खूप गाजलेल्या आहेत. त्यातच मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील बाळासाहेबांच्या सभांना विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत राज ठाकरे यांनी त्याच ठिकाणी आगामी सभा आयोजित केली आहे. त्यामुळे आता बाळासाहेबांच्या पावलावर राज ठाकरेंचे पाऊल पडणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.