मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे पर्यंत अनिल देशमुख यांची कोठडी वाढली असून त्यांचा न्यायालयीन कोठडीमधील मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांना आणखी १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस त्यांना कोठडीतच काढावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – बेल की जेल? राणा दाम्पत्याच्या जामिनावर होणार शनिवारी सुनावणी)
१३ मे पर्यंत देशमुख यांची कोठडी वाढली
अनिल देशमुखांची १३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढल्याने त्यांना अद्याप न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, देशमुखांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती त्यानंतर गेल्या सुनावणीदरम्यान देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती सीबीआयच्या वतीने करण्यात आली होती. या विनंतीनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली आणि देशमुख यांना २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शुक्रवारी न्यायालयाने ही कोठडी १४ दिवसांपर्यंत वाढवली असून ती १३ मे पर्यंत करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करत तपासाची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने सीबीआयला एफआयआर दाखल करून तपास करा, असे आदेश दिले होते. याआधी अनिल देशमुखांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या कोठडीत होते. त्यावेळी सीबीआयने सत्र न्यायालयात धाव घेत त्यांच्या चौकशीसाठी कोठडीची मागणी केली होती. त्याविरोधात अनिल देशमुख या मागणीविरोधात उच्च न्यायालयात गेले होते. त्या याचिकेवर सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. यानंतर आता सीबीआयने अनिल देशमुखांचा ताबा घेतला होता.
Join Our WhatsApp Community