शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या पीएना ‘खास’ प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
पुण्यातील महाराष्ट्र राज्य विद्या शाखा विकास अकॅडमीमध्ये शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाचे आणि जबाबदारीचे स्वरुप अवगत करून देणे, मंत्रालयीन कामकाज, विधिमंडळ कामकाज, तसेच विकास कामे यांच्यातील समन्वय आणि त्या कामांचा पाठपुरावा करणे, माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी, वेळेचे व्यवस्थापन याबद्दलचे प्रशिक्षण देणे, त्याचबरोबर माध्यमांसोबत कसा संवाद ठेवावा, याबाबत देखील प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी पीएस आणि ओएसडींना मार्गदर्शन करतील.
राज्यात सत्ताबदल झाल्यापासून मंत्रालयात अभ्यांगतांची रेलचेल वाढली आहे. अनेक कामे घेऊन राज्यभरातून नागरिक मंत्र्यांकडे येत असतात. या लोकांना भेटणे, त्यांना मार्गदर्शन करणे, मंत्र्यांच्या दैनंदीन कामकाजाची आखणी करणे, अशी विविध कामे पीएस, ओएसडी पार पाडत असतात. तसेच मंत्र्यांच्या खात्यातील विविध कामांचा पाठपुरावा देखील ते करीत असतात. ही कामे पार पाडत असताना, कामकाजातील क्षमतावाढीसाठी त्यांना दोन दिवस प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे कळते.
(हेही वाचा – ‘वंदे भारत’ ट्रेनमुळे महाराष्ट्रातील पर्यटन आणि तीर्थस्थळांचा विकास होणार; पंतप्रधान मोदींचा विश्वास)
Join Our WhatsApp Community