निविदा न काढता मंत्र्यांच्या दालनांवर कोट्यवधींचा खर्च?

122

शिंदे-फडणवीस सरकारमधील नवोदीत मंत्र्यांना दालनांचे वाटप करून एक महिना उलटला, तरी अद्याप निम्म्याहून अधिक मंत्र्यांनी मंत्रालयातून कारभार सुरू केलेला नाही. सध्या त्यांच्या दालनांचे नूतनीकरण सुरू असून, निविदा न काढताच कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

नवीन फर्निचर, खुर्च्यांसह अनेक वस्तूंचा समावेश

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनांवर कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात आली होती. नवीन फर्निचर, खुर्च्यांसह अनेक वस्तूंचा समावेश त्यात होता. कोरोना काळात जवळपास दोन वर्षे कारभार ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने बहुतांश मंत्र्यांनी दालनाची पायरी ओलांडली नाही. केवळ शासकीय बंगल्यांचा वापर त्यांच्याकडून केला जात होता. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर मविआचे मंत्री दालनांत येऊ लागले, तोवर सरकार गडगडले. त्यामुळे दालनांमधील सोफ्यांवरील धूळ झडली नसतानाही नव्या सरकारकडून पुन्हा कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

(हेही वाचा अखेर सर्व ३६ जिल्ह्यांना मिळाले पालकमंत्री, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे?)

दालनांच्या रचनेत बदल

विशेष म्हणजे, हा खर्च करताना निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. थेट ठेकेदाराची नियुक्ती करून दालनांच्या रचनेत बदल, रंगकाम केले जात आहे. सोफे, खुर्च्या आणि अन्य वस्तूंची खरेदी करण्यात आली आहे. काही मंत्र्यांना दालनाच्या प्रवेशाच्या दिशा तसेच कक्षाचे प्रवेश बदलून हवे आहेत. त्यामुळे नूतनीकरणाचे काम लांबल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील सूत्रांनी दिली.

पितृपक्षाची आडकाठी?

९ ऑगस्टला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिवसेना आणि भाजपकडून एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी नवनिर्वाचित मंत्र्यांना दालनाचे वाटप करण्यात आले. मात्र एक महिना उलटला तरी अद्याप १३ मंत्र्यांनी मंत्रालयातील दालनात पाऊल ठेवलेले नाही. काही मंत्र्यांनी दालनांत किरकोळ दुरुस्तीची सूचना केली होती. ती कामे पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी दालनाकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळत आहे. २५ सप्टेंबरला पितृपक्ष सरल्यानंतरच ही मंडळी मंत्रालयातून कारभार सुरू करतील, असे कळते. मंत्री दालनात बसत नसले तरी पीएस आणि ओएसडी मात्र मंत्री कार्यालयात बसतात. मंत्री महोदय सध्या त्यांना दिलेल्या शासकीय निवासस्थानातून कारभार हाकत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.