महाविकास आघाडीतील दोन मोठे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीला खिंडार पडले, तरी उरलीसुरली शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासह काँग्रेससोबतची (Congress) महाविकास आघाडी टिकून आहे. आघाडीच्या बैठका होत असतात. आगामी निवडणुकांसाठी जागा वाटपावर चर्चा होत असल्याचेही बोलले जात आहे, मात्र आता या महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत मिळत आहेत. त्याची सुरुवात विदर्भात होण्याची दाट शक्यता आहे, त्यासाठी काँग्रेस पक्ष बंडखोर बनेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
हेही पहा –
काँग्रेसचे युवक काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीतील संभाव्य फुटीचे संकेत मिळत आहेत. विदर्भात आमची काँग्रेसची ताकद जास्त आहे. राज्यात काँग्रेस पक्षच आघाडीत मोठा आहे. त्यामुळे विदर्भातील लोकसभेच्या १० जागा आमच्याच आहेत, असे विधान राऊत यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. कुणाल राऊत यांची नियुक्ती ही थेट पक्षाचे नेते राहूल गांधी यांनी राज्यातील कुणाही ज्येष्ठ काँग्रेस (Congress) नेत्याला विश्वासात न घेता परस्पर केली आहे. त्यामुळे राऊत यांचे वक्तव्य गंभीरतेने घेतले जात आहे. विदर्भातील लोकसभेच्या दहा जागांपैकी काही जागांवर शिवसेना उबाठा गटाचे खासदार निवडून येत होते आणि ते सध्या शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने शिवसेनेची तेथे ताकद कमी झाली असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत रामटेकच्या जागेसाठी कुणाल राऊत काँग्रेससाठी आग्रही होते.
(हेही वाचा Bharat : भारत UNSCचा स्थायी सदस्य झाला तर आम्हाला अभिमान वाटेल – तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन)
एकूणच काय तर कुणाल राऊत यांचे वक्तव्य ही महाविकास आघाडी अभेद्य आहे, असे छातीठोकपणे सांगणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासाठी भ्रमनिरास करणारे आहे. ज्याचा महाविकास आघाडीच्या भवितव्यावर परिणाम होणार आहे.
Join Our WhatsApp Community