महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. शरद पवार या परिषदेचे अध्यक्ष होते. भारतीय कुस्ती संघटनेची नवी दिल्लीत वार्षिक सर्वसाधारण बैठकीत झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा पवारांसाठी धक्का मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महासंघाच्या सूचनांनुसार १५ आणि २३ वयोगटांतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने केली नाही. त्या विरोधात जिल्हा संघटना आणि काही पैलवानांकडून आलेल्या तक्रारींमुळे ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी आगामी काही दिवसात हंगामी समितीची निवड होणार आहे. हीच समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह अन्य बाबींवर लक्ष देणार आहे.
राज्य कुस्तीगीर परिषदेकडून चांगला प्रतिसाद मिळत नव्हता – भारतीय कुस्ती संघटना
यावर भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून म्हणावा तसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. आम्ही १५ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन त्यांना करायला सांगत होतो, पण ऐनवेळी त्यांनी यासाठी नकार दिला. तसेच २०१९ मध्ये २३ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन करण्यासही ते तयार नव्हते. याशिवाय राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत बऱ्याच तक्रारी येत होत्या. यात जिल्हा संघटना आणि खेळाडूंच्या तक्रारींचा समावेश आहे. आमच्याकडून त्यांना संलग्नता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता, पण त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर या सर्व तक्रारींची दखल घेत आम्ही त्यांच्यावर कारवाई केली.
गैरसमज झाले असल्यास दूर करण्याचा प्रयत्न करणार – सर्जेराव शिंदे
दरम्यान राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी माध्यमांशी काहीही बोलण्यास नकार दिला. तर राज्य कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी सांगितले की, काही गैरसमज झाले असतील. ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी भारतीय कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी भेटून या प्रकरणावर तोडगा काढू.
( हेही वाचा: एकनाथ शिंदे यांची आता सोशल मीडियातही “शिंदेशाही” )
भारतीय कुस्तीगीर संघ आणि राज्य कुस्तीगीर परिषदेविषयी…
भाजपाचे खासदार बृजभूषण सिंग हे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत, तर विनोद तोमर सचिव आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे शरद पवार हे अध्यक्ष, तर बाबासाहेब लांडगे हे ४० वर्षांहून अधिक काळ सचिव आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे शरद पवार यांचे राज्य कुस्तीगीर परिषदेवर वर्चस्व आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे करण्यात येते. दरम्यान, बाबासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध काही दिवसांपूर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलनदेखील केले होते.
Join Our WhatsApp Community