श्रीलंका सध्या देशातील भीषण आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षेवगळता सरकारमधील सर्व मंत्र्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. यात महिंद्रा यांचा मुलगा आणि क्रीडा मंत्री नमल राजपक्षे यांचाही समावेश आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतही मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. 3 एप्रिल रोजी रात्री उशिरा मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी तत्काळ प्रभावाने राजीनामे दिले.
महिंदा राजपक्षे वगळता 26 मंत्र्यांचा राजीनामा
भारताचा शेजारील देश श्रीलंका आजवरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. रेशन, इंधन आणि वीज यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या तीव्र टंचाईचा सामना करत असलेले लोक सरकारच्या विरोधात देशाच्या विविध भागात रस्त्यावर उतरले आहेत. श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वांत बिकट आर्थिक संकटचा सामना करत आहे. श्रीलंकेत 1 एप्रिलपासून आणीबाणी लागू झाल्याची घोषणा करण्यात आली होती. देशात घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री एक मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर श्रीलंकेचे शिक्षणमंत्री दिनेश गुणवर्धने यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत माहिती दिली आहे. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता सर्व 26 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.
Sri Lankan Prime Minister Mahinda Rajapaksa's son Namal Rajapaksa resigns from all his portfolios. pic.twitter.com/XG2RBeu4QF
— ANI (@ANI) April 3, 2022
श्रीलंकेत आणीबाणी लागू
लोकांची नाराजी पाहून श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबायो राजपक्षे यांनी 1 एप्रिलच्या रात्री उशिरापासून देशात आणीबाणी जाहीर केली. दुसऱ्या दिवशी 2 एप्रिल रोजी सरकारने 36 तासांसाठी देशव्यापी कर्फ्यू जाहीर केला. 3 एप्रिल रोजी, श्रीलंकेत 36 तासांच्या देशव्यापी कर्फ्यू आणि सरकारविरोधी मोहिमेचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला आणि त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. एका मीडिया रिपोर्टनुसार, या काळात 664 आंदोलकांना अटक करण्यात आली. आंदोलक देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीय काळजीवाहू सरकार स्थापन करण्याची मागणी करत आहेत.
Join Our WhatsApp Community