एसटी सहकारी बँकेतील (ST Cooperative Bank) कर्मचाऱ्यांचा संप गेल्या महिन्याभरापासून सुरू असून या संपाची कोंडी काही केल्या फुटत नव्हती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बँकेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्यात मध्यस्थी घडवून आल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी सहकारी बँकेच्या संपाची सद्यस्थिती मांडण्यासाठी को-ऑपरेटिव्ह बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि या संघटनेचे सल्लागार, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी एसटी सहकारी बँकेमध्ये ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचे संचालक मंडळ काम करू लागल्यापासून सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि बँकिंग नियमन कायद्याला हरताळ फासत मनमानी कारभार सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हा चुकीचा कारभार पाहता बँकेतील 225 कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढून घेतल्या आहेत. याचा परिणाम म्हणून बँकेला 54 कोटींचा तोटा होऊ शकतो आणि याची कोणतीही जबाबदारी संचालक मंडळ घ्यायला तयार नसल्याचे मत अडसूळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडले.
(हेही वाचा-GST Collection : सप्टेंबर महिन्याच्या जीएसटी संकलनात १० टक्क्यांची वाढ)
संचालक मंडळाने कारभार स्वीकारल्यानंतर अनेक निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतले. त्यांनी घेतलेले हे निर्णय बँकेचे अधिकारी मानायला तयार नसल्याने आजमितीस बँकेचे कार्यकारी संचालक आणि सहव्यवस्थापक यांनी बँकेत येणे बंद केले आहे. तसेच आधीच्या संघटनेतील नेत्यांच्या मुलांना निलंबित करणे, त्याना सहकार्य केलेल्या कर्मचाऱ्यांची अडनिड्या ठिकाणी बदल्या करणे सुरू केल्याने अखेर ही दहशत मोडून काढण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांना संप करावा लागल्याचे त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे नीट ऐकून घेत बँक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि बँकेच्या भविष्यासाठी संप करणे योग्य नसून या वादात आपण स्वतः मध्यस्थी करू असे मान्य केले, मात्र त्यापूर्वी हा संप मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रश्नात लक्ष घालून तो सोडवण्याचे मान्य केल्यामुळे तसेच बँकेचे पदाधिकारी आणि सभासद यांचे नुकसान टाळण्यासाठी हा संप तूर्तास मागे घेण्याचा निर्णय को-ऑपरेटिव्ह बँक (ST Cooperative Bank) युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी जाहीर केला.
Join Our WhatsApp Community