संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रथम दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय पक्ष, नागरिक आणि प्रसार-माध्यमांना विशेष आवाहन केले. आपले मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वांचे आणि देशभरातील सन्माननीय संसद सदस्यांचे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वागत आहे. जागतिक परिस्थितीत, भारतासाठी विपुल संधी उपलब्ध आहेत. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन, जगभरात केवळ भारताची आर्थिक प्रगतीच नव्हे, तर भारतातील लसीकरण अभियान, भारताने स्वतः संशोधन करुन विकसित केलेली लस संपूर्ण जगात भारताविषयी एक विश्वास निर्माण करणारी ठरली आहे असे मोदी म्हणाले.
ही एक महत्वाची संधी ठरू शकते
अर्थसंकल्पीय अधिवेशनात, सर्व खासदारांची चर्चा, खासदारांच्या चर्चेचे मुद्दे, मोकळ्या मनाने केलेली चर्चा, जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करण्याची एक महत्वाची संधी ठरू शकते, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान म्हणाले की, सर्व आदरणीय खासदार, सर्व राजकीय पक्ष, अधिवेशनात मोकळ्या मनाने चर्चा करुन, प्रगतीच्या मार्गांवर वाटचाल करण्यासाठी, त्याला गती देण्यासाठी निश्चितच मदत करतील.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी
आगामी निवडणुकांवर भाष्य करताना मोदी म्हणाले, “हे खरे आहे, की वारंवार होत असलेल्या निवडणुकांचा परिणाम या अधिवेशनांवरही होतो, चर्चावर देखील त्याचा परिणाम जाणवतो. मात्र, मी सर्व सन्माननीय खासदारांना विनंती करतो, की निवडणुका आपल्या जागी असतात, त्या सुरुच राहणार आहेत. मात्र आपण सभागृहात.. संसदेचे हे अधिवेशन, एकप्रकारे पूर्ण वर्षभराचा आराखडा मांडणारे असते आणि म्हणूनच ते खूप महत्वाचेही असते. आपण सर्वांनी पूर्ण कटिबद्धतेने, हे अधिवेशन जितके जास्त फलदायी ठरवू शकू, तेवढ्याच जास्त संधी आपल्याला आगामी आर्थिक वर्षात, देशाची प्रगती करण्यासाठी मिळू शकतील.”
(हेही वाचा – पटोलेंना तातडीने बरखास्त करा, ‘या’ नेत्याने लिहिले थेट सोनिया गांधींना पत्र!)
या अधिवेशनात मुक्त चर्चा व्हावी, सभागृहाची प्रतिष्ठा जपत गांभीर्याने चर्चा व्हावी, मानवी संवेदनांचा विचार करुन चर्चा व्हावी, उत्तम उद्देशाने चर्चा व्हावी, ही अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, डॉ जितेंद्र सिंह, अर्जुन मेघवाल आणि व्ही मुरलीधरन उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community