- प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंगळवारी पुढे ढकलण्यात आलेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) गुरुवारी (१० ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता मंत्रालयात होणार आहे. गेल्या काही बैठकांप्रमाणे या बैठकीतही विक्रमी संख्येने निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. विशेषतः राज्यपाल नामनियुक्त सदस्य, धनगर आरक्षण याबाबत बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.
हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याने भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होईल. आचारसंहितेच्या काळात सरकारला निर्णय घेण्यावर बंधने येतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी धडाधड निर्णय घेण्यावर महायुती सरकारचा भर आहे. परिणामी गेला महिनाभर आठवड्याला मंत्रिमंडळाच्या दोन बैठका (Cabinet Meeting) होऊ लागल्या आहेत.
(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi ची दुसरी उमेदवार यादी जाहीर)
याआधीच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) सरकारने विविध समाजघटकांसाठी महामंडळांची घोषणा केली होती. याशिवाय सरकारी तिजोरीवर आर्थिक भार टाकणारे निर्णयही मंत्रिमंडळाने घेतले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीतही काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असून काही खात्यांचे प्रलंबित प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहेत. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी मंत्रालयात आंदोलन झाले. या मागणीची तीव्रता लक्षात घेऊन धनगर आरक्षणाच्या तिढ्याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त १२ रिक्त जागा भरण्याकडे सरकारचा कल आहे. महायुतीत या १२ जागांचे वाटप आणि विधान परिषदेवर पाठवायच्या सदस्यांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. त्यामुळे या १२ जणांच्या यादीला मान्यता देऊन ही यादी राज्यपालांकडे पाठविण्याचा निर्णय गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाऊ शकतो. दरम्यान, मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी अनेक मंत्री मुंबईत आले होते. मंगळवारची बैठक (Cabinet Meeting) रद्द झाल्याने अनेक मंत्री मतदारसंघात निघून गेले. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीला मंत्र्यांची उपस्थिती कमी राहण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community