मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ रोजी होणाऱ्या संभाव्य सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग आणि महापालिका निवडणूक विभाग यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत पुढील चार दिवसांमध्ये निवडणुकी बाबतचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत तरी मुंबई महापालिकेच्या निवडणूक विभागाचे काम पुढे चालूच राहू द्या, अशाच सूचना या बैठकीत देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः …तर मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचा कालावधी ७ वर्षांचा)
कोरोना काळात निवडणुका घेणे कठीण
मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयेागाकडून ठोस निर्णय घेतला जावा, यासंदर्भात महापालिका निवडणूक विभागाने पत्र व्यवहार केला होता. या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु.पी.एस.मदान आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत महापालिकेने आपल्या निवडणूक यंत्रणेला आवश्यक असणारी सर्व माहिती देताना, कोरोना काळात जर निवडणुका घ्यायच्या झाल्यास एक हजार ते दीड हजार मतदान केंद्रांतील बुथची संख्या दुप्पट करावी लागेल आणि त्या दृष्टीकोनातून इव्हीएम मशीनची संख्या वाढवावी लागेल, याचीही कल्पना दिली. त्यानुसार महापालिकेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर याबाबत पुढील चार दिवसांमध्ये याबाबतचा निर्णय कळवला जाईल, असे सांगण्यात आल्याचे समजते.
(हेही वाचाः महापालिकेची निवडणूक घ्यायची कि नाही?)
काय होणार निर्णय?
निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १ जानेवारी २०२१ रोजी मतदार याद्या प्रसिध्द केल्या आहेत. या मतदार याद्यांनुसारच ही निवडणूक घेता येऊ शकते. त्यामुळे कोरोना काळात सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करुनच ही निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेतात, की कोरोनामुळे ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांमध्ये याबाबतची भूमिका राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर झाल्यानंतर महापालिका निवडणूक विभाग जाहीर करेल, असेही बोलले जात आहे.
(हेही वाचाः मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेल्यास ‘या’ दोन पक्षांचा फायदा)
Join Our WhatsApp Community