भंडारा रोड ते भंडारा शहर या मार्गावर मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. त्यासाठी महारेलमार्फत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या ५०-५० टक्के आर्थिक सहभागासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.
भंडारा जिल्ह्यातील मेट्रो प्रकल्पासंदर्भात शुक्रवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल उपस्थित होते. जयस्वाल यांनी भंडारा रोड ते भंडारा शहर दरम्यान अस्तित्वातील ११ किमी. लांबीच्या रेल्वे मार्गिकेवर नवी ब्रॉड गेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास अहवाल सादर केला.
त्यानंतर नागपूर मेट्रो मार्गिकेला उपमार्ग सेवेने फिडर सर्विस जोडण्याच्या अनुषंगाने नागपूर शहर व परिसरातील भारतीय रेल्वेच्या मार्गावर सद्या अस्तित्वात असलेल्या पॅसेंजर ट्रेन्स ऐवजी रेल्वे आधारित आधुनिक प्रकारच्या वातानुकुलित बी. जी. मेट्रो ट्रेन्स सुरू करण्याच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली.
६२.७ किमी लांब मार्गिका
हा प्रकल्प नागपूर ते भंडारा रोड या भारतीय रेल्वे मार्गिकेवर राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये ११ स्थानके असून त्याची लांबी ६२.७ किमी आहे. भंडारा रोड ते भंडारा शहर नवी ब्रॉड गेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल महारेलने तयार केला आहे.
Join Our WhatsApp Community