महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारचे अनेक निर्णय बदलले आहेत. ठाकरे सरकारच्या काळात महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आलेल्या रुपाली चाकणकर यांनी मात्र आपल्या पदाबाबत भूमिका स्पष्ट केली. राज्यातील सरकार बदललं तरी मी महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार नाही, असं चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.
पद सोडण्याचा प्रश्नच नाही
राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे एक घटनात्मक पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्वाचे पद सोडून मी हे पद स्विकारले आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतरण झाल्यावर नवीन सरकार सत्तेत आले असले तरी हे महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं चाकणकर यांनी म्हटले आहे.
महिलांना न्याय मिळवून देणार
नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची नेमणूक करण्यात आली. आपल्या पदाचा कार्यभार सांभाळताना महिलांची सुरक्षा आणि त्यांच्यावर होणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचं काम आपण करणार असल्याचेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community