राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महिलांच्या सुरक्षेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधल्यानंतर राज्यातील भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारला महिलांच्या प्रश्नावरुन चांगलेच धारेवर धरलेले असतानाच आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून त्यांच्यावर जळजळीत टीका करण्यात आली आहे. राज्यातील भाजपाच्या ताई-माई-अक्का आणि दादांनी इतर राज्यांतील भाजपाच्या महिला महामंडळास लढण्याचे बळ देणे गरजेचे आहे, असे खोचक विधान सामनातून करण्यात आले आहे.
(हेही वाचाः महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील! सामनातून थेट इशारा)
भाजपा नेते गप्प का?
भाजपाशासित राज्यांत महिलांवर होणा-या अत्याचारांवर सामनातून खडा सवाल विचारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे महिला महामंडळ महिलांवरील अन्याय-अत्याचारांविरोधात राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. असे जागरुक महिला महामंडळ मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश राज्यांत नसावे याची खंत कुणाला वाटणार नाही? मध्य प्रदेशात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, उत्तर प्रदेशात महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू होतो, असे असतानाही तेथील भाजपा नेते गप्प का आहेत, असाही प्रश्न सामनातून विचारला आहे.
कोणाला काही फरक पडत नाही
महाराष्ट्रात भाजपाचे सरकार नाही आणि इतर दोन राज्यांत भाजपा सत्तेत आहे, हाच यातील मुख्य फरक आहे. त्यामुळे तेथे साधू-संतांचे मृत्यू झाले काय आणि मुलींवर अत्याचार झाले काय, कोणास काही फरक पडत नाही, अशी टीकाही सामनातून भाजपावर करण्यात आली आहे.
(हेही वाचाः राज्यपाल निभावतात मदमस्त हत्तींचा ‘रोल’! सामनातून घणाघात)
राज्यपालांनी खडे बोल सुनवावेत
राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी इतर राज्यांच्या राज्यपालांना खडे बोल सुनवायला हवेत. महाराष्ट्रात जसे विशेष विधानसभा सत्र बोलावण्याचे मुख्यमंत्र्यांना सुचवले, तसे कार्य भाजपाचे सरकार असलेल्या राज्यांतील राज्यपालांनीही करावे, असा आग्रह त्यांनी धरायला हवा, असा सल्लाही राज्यपालांना देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community