पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

69

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून, डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात त्यांना महागाईचा मार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

केंद्र सरकारची लुटमारी

मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून, सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. युपीए सरकार असताना पेट्रोलवर एक्साईज ड्युटी ९.४८ रुपये होती, ती आज ३२.९० रुपये म्हणजेच २५८ टक्के आहे. तर डिझेलवर ३.५६ रुपये असणार एक्साईज ड्युटी, आज ३१.८० रुपये म्हणजेच ८२० टक्के आहे. या एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या ७ वर्षांत तब्बल २० ते २५ लाख कोटी रुपयांची लुटमारी केली आहे.

(हेही वाचाः आता संभाजी राजेंचा एल्गार, पहिला मोर्चा 16 जूनला)

एक हजार ठिकाणी आंदोलन

२००१ ते २०१४  या चौदा वर्षांच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर १ रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर १८ रु. सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर २.५०, तर डिझेलवर प्रति लिटर ४ रुपये कृषी सेस घेतला जातो. या दरोडेखोरी विरोधात सोमवारी सकाळी ११ वाजता राज्यभर एकाचवेळी एक हजार ठिकाणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान तीन पेट्रोल पंपांवर आंदोलन करुन, मोदी सरकारचा तीव्र निषेध केला जाणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.

हे धनदांडग्यांसाठी काम करणारे सरकार

केंद्रात मनमोहन सिंह सरकार असताना, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलरपेक्षा जास्त प्रती बॅरल होत्या. पण तरीही देशाताली पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर सरकारने त्याचा परिमाण होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती जवळपास ६४ डॉलर प्रति बॅरल एवढ्या कमी असतानाही, पेट्रोल-डिझेलचे दर भरमसाठ वाढलेले आहेत. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून, ते फक्त मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे, असेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

(हेही वाचाः आता ‘बाप्पा’ही पाहत आहेत ‘नियमावली’ची वाट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.