Maratha Reservation : उपोषण थांबवा, जीव पणाला लावू नका; राज ठाकरे यांची मनोज जरांगे-पाटील यांना विनंती

... तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश-बिहार व्हायला वेळ लागणार नाही

240
Maratha Reservation : उपोषण थांबवा, जीव पणाला लावू नका; राज ठाकरे यांची मनोज जरांगे-पाटील यांना विनंती
Maratha Reservation : उपोषण थांबवा, जीव पणाला लावू नका; राज ठाकरे यांची मनोज जरांगे-पाटील यांना विनंती

इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवे आहे. ते एकदा मिळाले की हे आपली सगळी आश्वासने विसरणार, अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य नाही. त्यामुळे तुमचे उपोषण तुम्ही तत्काळ थांबवा, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना केली आहे. (Maratha Reservation)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी नांदेड जिल्ह्यात पुन्हा उपोषण आंदोलन सुरु केले आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यात ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मराठवाड्यात या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना एक्स या समाज माध्यमावर पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राज्य सरकारसाठी तुम्ही स्वत:च्या जीवाची बाजी लावू नका इच्छा ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी त्यांनी राज्य सरकारची संभावना निगरगट्ट आणि असंवेदनशील अशी केली आहे. (Maratha Reservation)

आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. अशा प्रश्नांना हात घालण्याची ह्या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असे मी मागे म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली ह्या गोष्टींनी ह्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही जीव पणाला लावू नका, असे राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे. (Maratha Reservation)

आरक्षणासाठी आता गावागावातील तरूण आत्महत्या करत आहेत हे तर फारच क्लेषदायक आहे. ह्या आंदोलनातून अशी घनघोर निराशा पसरणं अत्यंत वाईट आहे. तसंच ह्याचा शेवट आपल्या समाजा-समाजात विद्वेष पसरण्यात तर मुळीच व्हायला नको. कारण एकदा का ह्यानं ते टोक गाठलं की मग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकारच संपला. अठरापगड जातींना एकत्र बांधून स्वराज्याचा मंत्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यांच्या शिकवणीवर तर हा महाराष्ट्र उभा आहे. ते आपल्याला विसरता येणार नाही. ज्या महाराष्ट्राने या देशाचं प्रबोधन केलं, विचार दिले, स्वाभिमानानं कसं जगायचं ते शिकवलं तो महाराष्ट्र जातीपातीच्या विषप्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश – बिहार व्हायला वेळ लागणार नाही. ज्या ज्या विभूतींनी या आपल्या महाराष्ट्रावर इतकी वर्षे संस्कार केले ते धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. जातीपातीतलं द्वेषाचं राजकारण आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढयांना देशोधडीला लावणार नाही याची आपण सर्वानी आत्ताच काळजी घेणं महत्वाचं आहे. तसंच हे असलं किळसवाणं राजकारण जे आपले राजकारणी करत आहेत ते संपवणंही आपलं आद्य कर्तव्य आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Asian Champions Trophy Hockey : भारतीय महिलांची चीनवर २-१ ने मात)

जे ह्यांच्या कार्यकक्षेत येतच नाही अशा बाबतीत हे लोक आश्वासनं कशी देतात? विरोधी पक्षात असताना तुमची मतं मिळावीत म्हणून आरक्षणाच्या वारेमाप थापा मारायच्या. सत्तेवर येताच तत्काळ हा प्रश्न आम्ही मार्गी लावू म्हणून खोटं बोलणार आणि सत्तेत तुम्ही बसवलं कि, कोण तुम्ही? कसलं आरक्षण म्हणून पुन्हा हेच उद्धटासारखे तुम्हाला विचारणार. ह्या सर्वांची उत्तरं संविधानाच्या पानांत, संसद आणि विधानसभेच्या सभागृहात आणि सर्वोच्च न्यायालयात आहेत. मी ह्या पत्राद्वारे महाराष्ट्र सरकारकडे मागणी करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचे “विशेष अधिवेशन” भरवावे. सगळ्यांना हे ही कळू दे की सरकार कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे. ह्या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा, असे राज ठाकरे यांनी नमूद केले आहे. (Maratha Reservation)

समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला, कायमस्वरूपी तोडगा काढावा ह्यासाठी एकत्रपणे आपण काम करू. तुमच्या ह्या कामात मी आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहोतच. ही लढाई मोठी आहे ती आपण खांद्याला खांदा लावून लढू, अशी ग्वाही राज ठाकरे यांनी पत्रात दिली आहे. सगळेच मुद्दे असे रेंगाळत पडणं बरोबर नाही. त्यांच्या थापा विसरून पुन्हा पुन्हा त्याच त्याच पक्षांना निवडून दिल्याचा हा परिणाम आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. आपण सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. “सर्व मराठी एक” असा विचार केला पाहिजे. तसा केला तर आणि तरच आपण महाराष्ट्रात सुख, शांती निर्माण करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवशाली शिखरावर नेऊ शकू, असा विश्वास त्यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केला आहे. (Maratha Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.