सिल्व्हर ओक… राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान. नेहमीच राजकीय चर्चेत असलेले हे निवासस्थान सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले, ते म्हणजे सातत्याने होत असलेल्या भेटी-गाठींमुळे. आज तर राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. त्यामुळे या भेटीत नेमकं कोणतं राजकीय गणित शिजलं, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काळात राष्ट्रवादीची रणनीती आणि राजकीय कार्यक्रमाबाबत या भेटीत चर्चा झाली आहे. या बैठकीमध्ये देश पातळीवरच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेपासून कसे रोखता येईल आणि या निवडणुकीसाठी कोणता चेहरा वापरणे योग्य असेल, याबाबत महत्त्वाची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते.
(हेही वाचाः राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल! शरद पवारांचा आत्मविश्वास )
राष्ट्रवादीची रणनीतीही आखली
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणते कार्यक्रम आखले पाहिजेत, जेणेकरुन राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीमध्ये थेट फायदा होऊ शकेल, याबाबत देखील या भेटीत महत्त्वाची चर्चा झाली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा सध्या जनमानसामध्ये चांगली आहे. खास करुन कोविड परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार देशाच्या इतर राज्यांपेक्षा चांगले काम करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची सामान्य नागरिकांवर नेमकी काय छाप आहे? याबाबत देखील बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याचे समजते.
बंगाल मॉडेल लागू करता येऊ शकतं का?
देशातील इतर राज्यांत पश्चिम बंगाल मॉडेल राबवले जाऊ शकते का? या मुद्यावर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना स्पष्ट बहुमत मिळाले होते. या निकालामागे प्रशांत किशोर आणि शरद पवार यांनी महत्त्वाची रणनीती आखली होती. ममता बॅनर्जी यांच्या मागे रणनीती उभी करण्याचे काम प्रशांत किशोर यांनी केले होते. तर, पश्चिम बंगाल मध्ये विरोधकांची मते विभागली जाऊ नयेत, याची खबरदारी शरद पवार यांनी घेतली होती. ते स्वतःही ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालला जाणार होते. मात्र त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना पश्चिम बंगालला प्रचारासाठी जाता आले नव्हते. तरीही शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी संपूर्ण ताकद ममता बॅनर्जी यांच्या मागे उभी करुन, त्यांना बहुमत मिळवून देण्यास मदत केली होती.
(हेही वाचाः पृथ्वीराज ‘बाबां’ची पवारांना आजही वाटते भीती)
तीच पद्धत आता इतर राज्यांमध्ये येणा-या विधानसभा निवडणुकांसाठी देखील राबवता येऊ शकेल का? याची चाचपणी या बैठकीमध्ये झाली. विशेषतः पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील निवडणुकीवर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हे नेहमीच देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेपासून रोखता येऊ शकेल का? याची चाचपणी या बैठकीत झाल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत देखील शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात कोणता चेहरा वापरला जावा. याबाबत या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली आहे. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत शरद पवारांनी विरोधकांचे नेतृत्व करावे. त्यामुळे देशपातळीवर राजकीय वर्तुळात कोणते प्रभाव पडतील, याबाबत प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे.
(हेही वाचाः पवार-फडणवीस भेटीमागे दडलंय काय?)
राष्ट्रीय पातळीवर भाजप विरोधी आघाडी
2024 मध्ये भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचं असेल, तर देश पातळीवरील सर्व विरोधकांना एकत्र यावे लागेल. यासाठीची मोट बांधण्याचे काम केवळ शरद पवार करू शकतात. त्यासाठी त्यांनी आतापासूनच पुढाकार घ्यावा आणि भाजप विरोधी आघाडी तयार करावी, असा मुद्दा देखील प्रशांत किशोर यांनी या बैठकीत शरद पवार यांच्यापुढे ठेवला आहे.
देशातील कोविड परिस्थितीवर चर्चा
देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर केंद्र सरकारची प्रतिमा ही जनसामान्यात मलीन झाली आहे. लोकांच्या मनात केंद्र सरकार, तसेच पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल रोष आहे. हा रोष येणाऱ्या निवडणुकीमध्ये किती प्रभावशाली असेल, याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच जनसामांन्यांचा हा रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकार तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात, याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे.
(हेही वाचाः भाजपचे केंद्रात सरकार येताच लोकशाही धोक्यात! अजित पवारांचा हल्लाबोल )
Join Our WhatsApp Community