नीलकमल बोट अपघात प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई; Minister Nitesh Rane यांचे आश्वासन

46

मुंबईतील नीलकमल बोट अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्यानंतर नौदल आणि मुख्य बंदर अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समित्या स्थापन करण्यात आल्या असून चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane) यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात आमदार मिलिंद नार्वेकर यांनी या अपघातासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात आली आहे? असा सवाल केला असता मंत्री नितेश राणे यांनी सविस्तर माहिती दिली.

अपघाताची चौकशी आणि मदतकार्य

गेटवे ऑफ इंडिया येथून घारापुरी बेटावर जाणारी नीलकमल बोट नौदलाच्या स्पीड बोटीला धडकल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत 15 पर्यटकांचा मृत्यू, 2 प्रवासी गंभीर जखमी झाले, तर 98 प्रवाशांना भारतीय तटरक्षक दल, मुंबई बंदर प्राधिकरण, पोलीस विभाग आणि खाजगी बोटींच्या मदतीने वाचवण्यात यश आले.

(हेही वाचा औरंगजेबाची कबर हटवता आली नाही, तर…; Sunil Deodhar काय म्हणाले?)

राज्य सरकारने दुर्घटनाग्रस्त 10 मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उर्वरित मृतांच्या वारसांना मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमधूनही मदत करण्याबाबत विचार सुरू असल्याचे मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane)  यांनी सांगितले.

कायदेशीर कारवाई आणि बंदर विभागाची उपाययोजना

या अपघातानंतर कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर चौकशी सुरू आहे. तसेच इंग्लंड वेसेल अॅक्ट 1917 आणि महाराष्ट्र मायनर पोर्ट्स (पॅसेंजर वेसेल्स रुल्स) 1963 अंतर्गत प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केल्यामुळे संबंधित बोट मालक आणि चालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

याशिवाय, एमएल नीलकमल-1 या बोटीचे नोंदणी प्रमाणपत्र, सर्वे प्रमाणपत्र, प्रवासी परवाना आणि बोटीवर कार्यरत मास्टरचे सक्षमता प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गेटवे ऑफ इंडिया येथील प्रत्येक जेट्टीवर महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे जवान तैनात करण्यात आले असून प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होत नाही याची खात्री केली जात असल्याची माहितीही मंत्री राणे (Minister Nitesh Rane) यांनी दिली.

फायबर बोटीला प्रोत्साहन – सरकारचा नवीन निर्णय

सध्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर लाकडी बोटी वापरण्यात येतात, मात्र त्यांचा वेग कमी असल्याने फेऱ्यांची संख्याही मर्यादित राहते. त्यामुळे सरकारने लाकडी बोटीऐवजी फायबर बोटी वापरण्याचे धोरण स्वीकारले आहे.

फायबर बोटीमुळे पर्यटन वाढेल तसेच बोट चालक आणि मालकांचे उत्पन्नही वाढेल. सरकार मुंबई बँक तसेच इतर सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून बोट मालकांना आर्थिक मदत देण्याची योजना आखत आहे, असे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

नवीन सुरक्षाविषयक नियमावली

  1. प्रत्येक प्रवाशाला बोटीत बसण्यापूर्वी लाईफ जॅकेट घालणे बंधनकारक.
  2. प्रत्येक जेट्टीवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती.
  3. प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक झाल्यास तत्काळ दंडात्मक कारवाई.

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

नीलकमल बोट अपघात प्रकरणी सरकारने गंभीर दखल घेतली असून दोषींवर कारवाईसाठी तत्पर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता चौकशी अहवालानंतर कोणावर आणि कितपत कठोर कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Minister Nitesh Rane)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.