गोंदिया, भंडारा प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करणार – फडणवीस

152
गोंदिया-भंडारा येथे घडलेल्या घटनेची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी सुरू असून, सर्व आरोपींचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्याशिवाय यामध्ये बेजबाबदार असलेल्या पोलिसांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केली होती. याला उत्तर देताना फडणवीस यांनी पीडितेसोबत घडलेल्या घटनाक्रमाची माहिती दिली. संबंधित पीडित महिलेवरील शस्त्रक्रियेची व्यवस्था, तसेच मनोधैर्य योजनेंतर्गत मदत करण्यात येत आहे. या घटनेतील आरोपी पकडले जाईपर्यंत चौकशी थांबणार नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
फडणवीस म्हणाले, महिला अत्याचार प्रकरणांमध्ये कार्यवाही करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित असून त्याचे पालन करणे पोलिसांवर बंधनकारक आहे. एकूणच पोलीस आणि वैद्यकीय व्यवस्थाचे या अनुषंगाने प्रबोधन करण्यात येईल.
शक्ती विधेयक राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. या विधेयकातील काही मुद्द्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने माहिती मागितली आहे. त्याचा अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे. तसेच शक्ती विधेयक लवकर कायद्यात रूपांतरित व्हावे यासाठी आवश्यक तो सर्वं पाठपुरावा व्यक्तिशः तसेच एक स्वतंत्र अधिकारी नेमून करण्यात येईल. राज्यात अशा घटना घडू नये यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. या चर्चेत आमदार मनीषा कायंदे, शशिकांत शिंदे, अभिजित वंजारी, अमोल मिटकरी, महादेव जानकर, उमा खापरे यांनी सहभाग घेतला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.