देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठीचा (Delhi Assembly Election) प्रचार सोमवारी सायंकाळी समाप्त झाला. हाय-व्होल्टेज प्रचाराच्या तोफा शांत झाल्याने आता दिल्लीकर त्यांचा कौल देण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिल्ली निवडणुकीसाठी बुधवारी (५ फेब्रुवारी) मतदान होईल. यासाठी दिल्लीत तगडा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.
दिल्लीत विधानसभेच्या एकूण ७० जागा आहेत. त्या संख्याबळाचा विचार करता दिल्ली विधानसभा इतर अनेक राज्यांमधील विधानसभांच्या तुलनेत छोटी आहे. मात्र, थेट देशाच्या राजधानीतील विधानसभा असल्याने संबंधित निवडणुकीला (Delhi Assembly Election) संपूर्ण देशाच्या दृष्टीने मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातून सर्वच राजकीय पक्षांनी दिल्लीत बाजी मारण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीला आप, भाजप आणि काँग्रेस यांच्यातील तिरंगी लढतीचे स्वरूप आले आहे. त्या पक्षांनी अतिशय आक्रमक पद्धतीने प्रचार मोहिमा राबवल्या. त्यातून प्रचारकाळात दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. यामुळे कोणता राजकीय पक्ष सत्ता स्थापन करणार, आश्चर्य घडवणार का याविषयी उत्सुकता आहे. नेमके काय घडणार या प्रश्नाचे उत्तर ८ फेब्रुवारीच्या निकालातून मिळेल.
दिल्लीची निवडणूक (Delhi Assembly Election) शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सुरक्षा जवानांनी कंबर कसली आहे. निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी सुरक्षा जवान मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत. यात 42,151 दिल्ली पोलिस, 19 हजार होमगार्ड आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या दोनशे कंपन्यांचा समावेश आहे. पोलिसांनी 121 मोठ्या आणि 43 लहान सीमांवर कडक पहारा बसविला आहे. संशयास्पद वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. निवडणूक आयोगाकडूनही सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 13,766 मतदान केंद्रावर एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभेत एक मतदान केंद्र पूर्णपणे महिलांद्वारे संचालित केले जाणार आहे. याशिवाय, 7० मतदान केंद्रांचे व्यवस्थापन पूर्णपणे दिव्यांगांकडून केले जाईल. दिव्यांग मतदारांसाठी 4,217 व्हीलचेअर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. लहान मुलांसाठी पाळणाघराची सुविधा उपलब्ध असेल.
दिल्लीचा मतदार डेटा
दिल्लीतील एकूण मतदारांची संख्या 1 कोटी 55 लाख 24 हजार 858 आहे. यात 83 लाख 49 हजार 645 पुरुष, 71 लाख 73 हजार 952 महिला आणि 1261 ट्रान्सजेंडर मतदारांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांत महिला आणि पुरुष मतदारांच्या संख्येत थोडीशी वाढ झाली आहे आणि ट्रान्सजेंडर मतदारांची संख्याही 30 ने वाढली आहे. (Delhi Assembly Election)
Join Our WhatsApp Community