उद्धव ठाकरे गटाचे विले पार्लेतील माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत आणि शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष मोहन गोयल यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यांच्यासोबत शिवसेना शाखा क्रमांक ८३ चे शाखाप्रमुख नरेश सावंत, महाराष्ट्र नाथयोगी सेवा समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष भावेश राजपूत, शाखा क्रमांक ८२ चे उपशाखाप्रमुख राजाराम यादव, शिव वाहतूक सेनेचे सचिव कल्पेश बालघरे आणि शिव वाहतूक सेनेचे उत्तर मुंबई लोकसभा संघटक मुस्तकिम शेख यांनीही आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
त्याचप्रमाणे पनवेलचे महानगर प्रमुख ॲड. प्रथमेश सोमण यांच्या पुढाकाराने पनवेल राष्ट्रवादीच्या युवा सेलचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष महेश सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहरात अध्यक्ष सिद्धेश खानविलकर, ठाकरे गटाचे उसरली शाखाप्रमुख विवेक घाणेकर, दीपक प्रभू, सुनिल पलसमकर यांनीही यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे स्वागत करताना मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सरकार जोमाने काम करत असून हे शहर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. समाजातील शोषित वंचित घटकासाठी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे यावेळी बोलताना सांगितले. मुंबईत शिवसेनेची ताकद वाढत असून आगामी निवडणुकीत त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.
(हेही वाचा – Chandrayaan – 3 : अंतराळात जाणारे सर्वच यान सफेद रंगाचेच का असतात? जाणून घ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे मानले आभार
- अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी वर्षा या निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
- या विद्यार्थ्यांना शासकीय अध्यादेशातील चुकीचा फटका बसल्याने ते शासकीय शिष्यवृत्ती पासून वंचित राहिले होते. सरकारने शिष्यवृत्तीबाबत काढलेल्या अध्यादेशात इलेक्ट्रॉनिकस आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हेच नाव दोनदा लिहिले गेल्याने इलेक्ट्रॉनिकस अँड कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले होते.
- त्यामुळे पनवेलच्या पिल्ले महाविद्यालयानी या विद्यार्थ्यांना ४ लाख रुपये फी भरण्यास सांगितले होते. अखेर पनवेल महानगर प्रमुख ॲड. प्रथमेश सोमण यांनी हा मुद्दा उचलून धरला, तर खासदार श्रीरंग बारणे यांनी त्याचा पाठपुरावा करून शासन आदेशात तशी दुरुस्ती करून घेतली. त्यामुळे या अभ्यासक्रमातील असंख्य विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
- तसेच पनवेल एसटी आगारात वर्षानुवर्षे पदपथ विक्रेते म्हणून काम करणाऱ्या फेरीवाल्यांना कोणतीही ओळख नव्हती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे निर्देश दिल्याने त्याना पनवेल एसटी आगाराच्या वतीने ओळखपत्र मिळवून देण्यात आली. त्याबद्दल या विक्रेत्यांनी वर्षा या निवासस्थानी येऊन मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community