सुधीरभाऊंचा सरकारवर घणाघात… म्हणाले, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे!

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज आहे त्याशिवाय पर्याय नाही, असे धक्कादायक विधान सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केले.

आज राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले. जळगाव जिल्ह्यातील वसतीगृहात मुलींसोबत झालेल्या घृणास्पद प्रकाराबाबत सुधीर भाऊ आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज सभागृहात सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

अत्यंत निंदनीय घटना

महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याचा प्रकार जळगावातील महिला वसतीगृहात घडल्याची बाब,  भाजप आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेसमोर मांडली. त्या वसतीगृहातील तरुणींना विवस्त्र करुन डान्स करायला लावले गेले आणि त्याचा व्हिडिओ बनवण्यात आल्याचा निंदनीय प्रकार घडला असल्याचे, श्वेता महाले यांनी सांगितले. हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. जळगावातील आशादीप वसतीगृहात हा प्रकार घडल्याची माहिती आमदार श्वेता महाले यांनी दिली. महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. आपण मोठ्या अभिमानाने सांगतो की हा महाराष्ट्र हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. आपल्या लेकी या सावित्रीच्या लेकी आहेत, रमाईच्या लेकी आहेत. पण आपले रक्षक असणा-या पोलिसांनीच महिलांची अशी दयनीय अवस्था करणं, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. असं आमदार श्वेता महाले म्हणाल्या. या सगळ्या प्रकारामुळे तिथल्या मुली या भयभीत झाल्या आहेत, त्यामुळे लवकरात लवकर दोषींवर कारवाई करावी.

(हेही वाचाः फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीची आता चौकशी होणार!)

सुधीरभाऊ आक्रमक

या मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले. ही अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे. इथे मृत मनाची माणसे आहेत का, तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. उत्तरात चौकशी कधी होईल, हे सांगितलं पाहिजे, असे आक्रमक विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले. या महाराष्ट्रात आयाबहिणींची अब्रू सुरक्षित नाही आणि आपण फक्त त्याची नोंद घेत आहोत. हे दुर्दैव आहे. हे सरकार कशासाठी आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज आहे त्याशिवाय पर्याय नाही, असे धक्कादायक विधान सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केले.

नवाब मलिक यांचा आक्षेप

मुनगंटीवार यांच्या विधानावर आक्षेप घेत कॉंग्रेस नेते नवाब मलिक म्हणाले, की मुनगंटीवार हे आता धमक्या देत आहेत. ही गोष्ट योग्य नाही. त्यामुळे त्यांचं हे विधान सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावं, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी मलिक यांची मागणी मान्य करत संबंधित विधान तपासून मुनगंटीवारांचं विधान कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असं सांगितलं.

(हेही वाचाः फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीची आता चौकशी होणार!)

फडणवीसांचे मत

नवाब मलिक यांनी सुधीर मुनगंटीवारांच्या विधानावर आक्षेप घेतल्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांच्या विधानाबाबत मत मांडले. जर सरकार योग्य पद्धतीने काम करत नसेल तर लोकशाहीत कोणालाही सरकार बरखास्त करू, असं बोलण्याचा अधिकार आहे. या घटनेची व्हिडिओ क्लिप उपलब्ध असताना संवेदनशीलतेने या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

लवकरच चौकशी होणार

दरम्यान, जळगाव प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन दिवसांत या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करू, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात दिलं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here