नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर, भाजपा आक्रमक झाली असून, राज्यभरात आंदोलनं सुरु आहेत. त्यातच आता भाजपाचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोले जे बोलतात ती हास्यजत्रा असते, म्हणूनच त्यांनी आता महाराष्ट्राचे ‘पप्पू’ म्हणून नामाभिमान मिळवलाय, असं म्हणत मुनगंटीवार यांनी पटोलेंवर खोचक टीका केली आहे.
ती एक हास्यजत्रा
नाना पटोले यांना विस्मरण होण्याचा एक आजार झाला आहे. त्यांची मागच्या 10 वर्षातील काॅंग्रेसबाबतची भाष्य ऐकली, तर ती सुद्धा एक हास्यजत्रा होईल. काॅंग्रेसबद्दल ते काय बोलायचे, किती वाईट बोलायचे, सोनिया गांधींविषयी ते कसे बोलायचे याचे त्यांचे 10 वर्षांचे रेकाॅर्ड आहेत. ते विधानसभेतदेखील काॅंग्रेसबद्दल अतिशय निन्म शब्दात बोलले आहेत. म्हणून ते जे काही बोलतात ती एक हास्यजत्रा आहे आणि त्यामुळेच त्यांना आता महाराष्ट्रचे पप्पू म्हणून नामाभिमान दिला गेल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
( हेही वाचा :पटोले हे मनोरुग्ण आहेत का? भाजपाचा पटोलेंवर पलटवार! )
नानांच्या बुद्धीला गंज चढलाय
नाना पटोले यांच्या बुद्धीला गंज चढला आहे. सत्तेच्या मोहात जेव्हा पक्ष वाढत नाही, तेव्हा अशा पद्धतीचं भाष्य केलं जातं, आता केंद्र सरकारबद्दल भाष्य केलं जातंय. आपल्या राज्यात आपल्यावर असलेली जबाबदारी विसरायची आणि येता-जाता प्रत्येक गोष्टीला केंद्र कसं जबाबदार आहे, अशी बेजबाबदार विधानं करायची. हा एक नवीन छंद आमच्या नाना भाऊंना जडला आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.