महाराष्ट्र भाजपामधील पहिल्या फळीतील नेते अशी ओळख असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना २०२४ नंतर केंद्रात संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गमावलेल्या चंद्रपूर मतदारसंघावर भाजपाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून, हंसराज अहिर यांच्याऐवजी मुनगंटीवारांना संधी देण्याबाबत केंद्रीय नेतृत्त्वात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा : अयोध्येतील राम मंदिर केव्हा तयार होणार? अमित शाहांनी सांगितली तारीख)
गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजप-शिवसेना युतीने चांगले यश मिळविले. मात्र,चंद्रपूरचा गड त्यांना गमवावा लागला. कॉंग्रेसच्या बाळू धानोरकरांनी भाजपाच्या हंसराज अहिर यांना पराभूत केले. २०१९ ला कॉंग्रेसला मिळालेली ही राज्यातील एकमेव जागा होती. त्यामुळे हा पराभव भाजपच्या फारच जिव्हारी लागला होता. २०१९ ची कसूर भरून काढण्यासाठी भाजपा आता सरसावली असून, अहिर यांच्याऐवजी राज्यातील आश्वासक चेहरा देण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत.
त्यात वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटावार यांचे नाव आघाडीवर आहे. सर्वसमावेशक, अभ्यासू आणि सामान्यांत मिसळणारा चेहरा म्हणून मुनगंटावार यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांना चंद्रपुरातून लोकसभेला संधी दिल्यास भाजपाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास केंद्रीय नेतृत्त्वाला आहे. शिवाय अर्थमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असतानाही राज्यातील नव्या सरकामध्ये डावलण्यात आल्याने ते काहीसे नाराज आहेत. त्यामुळे केंद्रात संधी देऊन त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सकारात्मक असल्याचे कळते.
२४ कलमी कार्यक्रम
- चंद्रपूर लोकसभा मतदार संघात भाजपने २ हजार १८५ बुथची रचना केली आहे. या बुथवरील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा २४ कलमी कार्यक्रम तयार केला आहे. त्यानुसार केंद्रीय पातळीवरील नेत्यांचे लोकसभा प्रवास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
- लोकसभा प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक उद्योगपतींपासून तर व्यापारी, प्रतिष्ठीत मंडळी, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या बैठकांसह एक छोटेखानी जाहीर सभा देखील घेतली.
- त्यानंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही या जिल्ह्याचा दौरा करताना महिलांशी संवाद साधला. या भागातील समस्यांसोबतच महिलांचे प्रश्न जाणून घेतले. महिलांचा मेळावा घेतला.
- २ जानेवारीला राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहीर सभेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मुस्लीम धर्मीयांचे श्रध्दास्थान दर्गा व हिंदूसाठी पवित्र माता महाकाली मंदिर असा सामाजिक समतोल राखत नड्डा यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.