शरद पवार यांनी निवृत्त व्हावे ही सायरस पूनावाला यांची इच्छा होती असे नाही. त्यांच्याच पक्षातील लोकांनीही हे सांगितले होते. त्यासाठीच पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु माणूस मोहमायेपासून मुक्त होऊ शकत नाही. आता मित्राने सल्ला दिला. आता मित्राचा सल्ला ऐकायचा की नाही हे मी सांगू शकत नाही. मुंबईत बॉम्बस्फोट १२ ठिकाणी झाले पण १३ वे ठिकाण कपोकल्पित का सांगितले त्याचे उत्तर शरद पवारांकडेच आहे माझ्याकडे नाही, असे म्हणत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
आतापर्यंत शरद पवार कुठलीही चौकशी सुरू झाली तर यात राजकारण आहे असे म्हणायचे. परंतु बुधवारीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसून शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुणाबद्दल शंका असेल तर त्यांनी चौकशी करायला पाहिजे. आता हे आजूबाजूला बसलेल्या लोकांकडे बघून हे विधान केले की काय, हे तपासले पाहिजे. आता जेव्हा चौकशी होईल तेव्हा रडायचे नाही. आम्हाला त्रास दिला जातोय असे न म्हणता चौकशीला सामोरे जायचे आणि उत्तरे देऊन त्यातील सत्य काय हे बाहेर येऊ द्यायला मदत करायची, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
मंत्री सुधीर मुनगंटीवर म्हणाले की, इंडिया आघाडीच्या बैठकीत जनतेच्या प्रश्नांवर काहीच चर्चा होणार नाही. लालूप्रसाद यादव म्हणतात मोदींच्या नरडीवर बसायचे आहे, पण ही मुंबई आहे, २०२४ च्या निवडणुकीत या सर्वांना तिरडीवर घेऊन लोक जातील. नरडीवर बसण्यासाठी तुम्ही एकत्र येत आहेत, देशाच्या विकासासाठी एकत्र येत नाहीत. नरेंद्र मोदींना हटवणे हा एकमेव किमान समान कार्यक्रम आहे. संजय राऊत यांना पाहून यंत्र घाबरतात, माणसे घाबरतात, पक्षातील लोकही इतके घाबरतात की त्यांना सोडून गेले. संजय राऊतांजवळ राहिले तर करंट लागतो असा त्यांचा समज आहे अशी टीकाही त्यांनी केली.